पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती वसंत लक्ष्मण शिंदे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे मॅडम यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. वसंत लक्ष्मण शिंदे (वय 52, रा. गुंजाळे, ता. राहुरी, जि. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी बाली काळू निकम (रा. गुंजाळे, ता. राहुरी) ही कुटुंबासह राहुरी तालुक्यात राहत होती. तिच्या घराजवळच तिची आई मयत अलकाबाई व वडील वसंत लक्ष्मण शिंदे हे राहत होते. 16 ऑगस्ट 2021 रोजी अलकाबाई हिने मुलगी बाली हिला सांगितले होते की, ‘मला मुलाकडे बांगर्डे येथे राहण्यासाठी जायचे आहे. मात्र, तुझे वडील जाऊ देत नाहीत व दारू पिऊन भांडण करतात.’
त्यानंतर 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे याने पत्नीला मारहाण केली. यामध्ये ती गंभीर जखमी होऊन मयत झाली, अशी तक्रार आरोपीची मुलगी बाली निकम हिने राहुरी पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र पाठविले. सदर केसची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे मॅडम यांच्या न्यायालयात झाली. या केसमध्ये फिर्यादी सरकारच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सदर प्रकरणात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास साळवे, रोहित पालवे व योगेश वाघ यांनी तपासात मदत केली.
सदर केसमध्ये मयताचा मृत्यू हा आरोपीच्या ताब्यात असताना झाला. तसेच आरोपीकडून रक्ताने भरलेले कपडे पुरावा म्हणून जप्त केले होते, तो पुरावा तसेच रासायनिक अहवाल, मयताने मृत्यूपूर्वी फिर्यादीस सांगितलेली घटना या गोष्टी ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले.