खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानधारा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह 15 संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची 31 लाख 61 हजार 274 रुपयांसह इतर सात ठेवीदारांची 34 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये एकूण 66 लाखांची फसवणूक झाली आहे.
ज्ञानधारा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बीडच्या श्रीरामपूर शाखेचे अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे (रा. बहिरवाडी, अंबेजोगाई, बीड), व्हाइस चेअरमन यशवंत वसंत कुलकर्णी (रा. बीड), तसेच संचालक वसंत शंकरराव सतले (रा. ज्ञानधारा भवन, बीड), वैभव यशवंत कुलकर्णी (रा. शिंदेनगर, अंबेजोगाई, बीड), कैलास काशिनाथ मोहिते (रा. जिरेवाडी, बीड), शिवाजी रामभाऊ पारसकर (रा. बीड), रवींद्र मधुकर तलवे (रा. बीड), आशीष पद्माकर पाटोदेकर (रा. बीड), आशा पद्माकर पाटोदेकर (रा. बीड), रेखा वसंतराव सतले (रा. बीड), रघुनाथ सखाराम खारसाडे (रा. बीड), रवींद्र श्रीरंग यादव (रा. बीड), दादाराव हरिदास उंदरे (रा. ज्ञानराधा भवन, जालना रोड) व कर्मचारी निर्मल चव्हाण (रा. जाफराबाद, जि. जालना), विठोबा बनकर (मु. पो. गोमळवाडा, ता. शिरूरकासार, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सर्वांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कांदा मार्केट परिसरातील मीरा पांडुरंग जायभाय (वय 45) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
‘माझे ज्ञानधारा मल्टिस्टेट पतसंस्थेत बचत खाते आहे. सन 2022पासून या पतसंस्थेची सभासद आहे. मी व माझे पती पतसंस्थेत गेलो असता, पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, तसेच संचालकांनी तुम्ही आमच्या पतसंस्थेत मुदत ठेव ठेवा. मुदत ठेवीवर 12 टक्के व्याज देऊ, असे सांगितले. यावर विश्वास ठेवून 31 लाख 61 हजार 274 रुपयांची मुदत ठेव ठेवली. पतसंस्थेत केलेल्या पावत्यांवरील रकमांची आवश्यकता असल्याने पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत जाऊन व्याजाची मागणी केली. त्यावेळी ‘कॅश शिल्लक नाही,’ असे सांगण्यात आले. पैशांबाबत वारंवार पतसंस्थेचे संचालक, मॅनेजर, चेअरमन यांना अडचण सांगितली. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. याबाबत जास्त माहिती घेतली असता, अशाच प्रकारे अनेक ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समजले,’ असे मीरा जायभाय यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
यांचीही झाली फसवणूक
फिर्यादी मीरा जायभाय तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या असता, त्या ठिकाणी संतोष कचरू पटारे यांची चार लाख 24 हजार रुपये, संदीप शिवाजी गवारे (रा. शिरसगाव) आठ लाख 30 हजार रुपये, मीना संतोष पटारे (रा. टाकळीभान) यांची सात लाख, बाळासाहेब गोविंद ढाकणे (रा. अशोकनगर) यांची दोन लाख 68 हजार 905 रुपये, राजेंद्र दत्तात्रय पवार (रा. श्रीरामपूर) यांची एक लाख 77 हजार 543 रुपये, गायत्री पराग पवार (रा. श्रीरामपूर) यांची 12 लाख 27 हजार 630 रुपये, तर शिवाजी काशिनाथ गवारे यांची दोन लाख 35 हजार रुपये अशी फसवणूक झाल्याचे समजले.