अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे दहशतवाद्यांना प्रेरणा, संजय राऊत यांची जोरदार टीका

अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे वेष बदलून आणि नाव बदलून मुंबई आणि दिल्ली विमानतळावर वावरत होते. त्यांच्या या कृतीमुळे दशहतवाद्यांना प्रेरणा मिळाली, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जी वेषांतर करून विमान प्रवास करताना जी ओळखपत्र वापरली ती जप्त करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मंगळवारी दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा राऊत म्हणाले की, दिल्लीत अजित पवार आले. त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. मुंबईहून दिल्लीला येताना पवार 10 ते 12 वेळा वेष पालटून आले. फक्त वेष नाही बदलला तर बनावट नावानेही आले. त्यांचे सर्व बोर्डिंग पास जप्त करावेत अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच अजित पवार वेष पालटून आले होते, दाढी मिशा लावल्या होत्या, टोप्या घातल्या होत्या. अशा बऱ्याच गोष्टी केल्या असं ते स्वतः सांगत आहेत. या महाराष्ट्राला रंगभुमीची मोठी परंपरा आहे. अनेक कलावंत या रंगभुमीने या महाराष्ट्राला दिले आहेत. विष्णूदास भावे यांनी 1842-43 साली रंगभुमीची स्थापना केली. त्यानंतर हे बारामतीचे विष्णूदास निर्माण झाले आहेत, असेही राऊत म्हणाले.

यावरून देशातील विमानतळांची सुरक्षा किती पोकळ आहे हे दिसून येतेय. कोणताही माणूस बनावट नावाने वेष पालटून दिल्ली आणि मुंबईसारख्या राजधानींच्या विमानतळांवर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तीच व्यक्ती जाऊन देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटते. याचा अर्थ हा राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ झाला. यात देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री सामील आहेत. याची प्रेरणा घेऊन दहशतवादी घुसू शकतात. दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात? किंवा जे उद्योगपती परदेशात पळून गेलेले आहेत त्यांनी दिल्ली आणि मुंबई विमानतळावर प्रवास केला असेल का? दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील यांनाही वेष पालटून मुंबई दिल्लीत येण्याची मुभा मिळली होती का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

यामुळे अतिरेकी आणि दहशदवाद्यांना प्रेरणा मिळाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ते आणि सरकार कोसळण्यापूर्वी एकनाथ शिंदे वेष पालटून फिरत होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत ते मौलवीच्या वेषात गेले होते. त्यांना दाढी आहेच. पण नाव बदलून ते मौलवी म्हणून दिल्लीत गेले होते. मौलवी शोभतात ते. जरी त्यांनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली असली जरी आनंद दिघेंचे ते शिष्य म्हणवून घेत असतील तरी ते मौलवीच्या वेषात दिल्लीत गेले आणि अमित शहांना भेटले, असे राऊत म्हणाले.

अजित पवार, एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून दिल्लीत येतात. विमानळावर कोणी रोखत नाही याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेले आहेत. पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधारकार्ड असेल. कारण या ओळखपत्रांशिवाय आत सोडत नाहीत. या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणे गरजेचे आहे. आणि प्रवासात त्यांनी जी ओळखपत्र वापरली ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवर गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही राऊत यांनी केली. यातून त्यांनी दहशतवादाला प्रेरणा दिली आहे. आम्ही महाराष्ट्रातले काही प्रमुख नेते याच्यावर चर्चा करणार आहोत. आमच्यासाठी हा गंभीर विषय आहे. प्रश्न फक्त अजित पवार आणि अमित शाहांचा नाहिये. य़ा देशात चीन का घुसलेत, कश्मीरमध्ये अतिरेकी का घुसलेत. ही तालिम एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांनी दाखवून दिले आहे असेही राऊत यांनी नमूद केले.