मावळमधील तिहेरी हत्याकांडप्रकरणी पनवेलमधून डॉ. अर्जुन पोळ याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कळंबोलीतून पोळ याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
६ ते ९ जुलै दरम्यान मावळमध्ये राहणाऱ्या पीडितेला गर्भपातासाठी कळंबोली येथील अमर रुग्णालयात आणले होते. पीडितेसोबत तिचे दोन व पाच वर्षांची बालके होती. पीडितेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्यावर तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराने पीडितेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला होता. त्यांच्या आईला इंद्रायणीत फेकल्याचे पाहून बालकांनी हंबरडा फोडल्याने नराधम प्रियकराने जिवंत बालकांनादेखील इंद्रायणीत फेकून दिले होते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
अमर रुग्णालयातील डॉ. पोळ याची मागील तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. अखेर तळेगाव एमआयडीसी पोलिसांना चौकशीअंती डॉ. पोळ याला अटक केल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम म्हस्के यांनी दिली. डॉ. पोळ याने पीडितेचा उपचारानंतर मृत्यू झाल्याची बाब स्थानिक पोलिसांपासून लपवून ठेवली, तसेच कुटुंबातील कोणी नसताना मृतदेह प्रियकराच्या हवाली केला होता.