एका व्यक्तीने 20 महिलांशी लग्न केले आहे. त्यांच्याशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या नराधमाचे कारनामे सुरूच असते, पण एका पीडित महिलेने पोलिसांकडे याबाबत वाच्यता केली आणि आरोपीचे बिंग फुटले.
पालघरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांत तक्रार केली की तिचे एका व्यक्तीसोबत लग्न झाले. पण लग्नानंतर या व्यक्तीने या महिलेकडून लॅपटॉप, दागिने आणि साडे सहा लाख रुपये लुटले. पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि गुन्हा दाखल केला. सखोल तपास करून पोलिसांनी आरोपी फिरोझ नियाझ शेखला अटक केली.
फिरोझ 43 वर्षांचा असून तो मॅट्रिमोनियल साईटवर आपले नाव नोंदवायचा. मॅट्रिमोनियलवर विधवा आणि घटस्फोटित महिलांना हेरून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकावायचा. त्यांच्याशी लग्नही करायचा. लग्नानंतर तो आपल्या बायकोकडून पैसे, दागिने आणि इतर वस्तू मागायचा. हे सर्व घेऊन फिरोझ पसार व्हायचा.
अनेक महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे. पण लाजेखातर त्या गप्प बसायचा. यावरून फिरोझचे फावले होते. फिरोझने अशाच प्रकारे पालघरमध्ये एका महिलेशी लग्न केले. तिच्याकडून पैसे, लॅपटॉप आणि इतर मुल्यवान वस्तू बळकावल्या आणि पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मोठ्या शिताफिने फिरोझला अटक केली.
पोलिसांनी जेव्हा फिरोझची चौकशी केली तेव्हा पोलिस अचंबित झाले. फिरोझने अशा प्रकारे एक नव्हे दोन नव्हे तर 20 महिलांना गंडा घातला होता. पोलिसांनी फिरोझकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेकबुक आणि दागिने जप्त केले आहेत.