खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली तर ईडीच्या कारवाईपासून सुटका करण्याची ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिली होती, असा आरोप माजी गृह मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी केल्यामुळे खळबळ उडाली असून फडणवीसांच्या ऑफरचा नावासह देशमुख यांनी आता गौप्यस्फोट केला आहे. जनसुराज्य शक्ती पार्टीचा युवा अध्यक्ष समित कदम फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता, असे देशमुख म्हणाले.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाच्या आरोपातून सुटका हवी असेल तर चार खोटी शपथपत्रे सादर करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑफर’ दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांना बोगस प्रकरणामध्ये अडकवण्यासाठीही फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला होता. अन्य प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांच्यावर आरोप होते, तर अजित पवार यांनी मला गुटखा व्यावसायिकांकडून वसुली करण्यासाठी सांगितल्याचेही एक प्रतिज्ञापत्र होते. ही खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आपल्याकडे पाठवले होते. ही प्रतिज्ञापत्रे दिल्यास ईडीची कोणतीही कारवाई होणार नाही, अशी ऑफर समित कदममार्फत फडणवीस यांनी दिली होती. ही व्यक्ती अनेकदा आपल्याकडे आली होती, असे देशमुख यांनी सांगितले होते.
देशमुखांच्या विरोधात कुभांड
अनिल देशमुख जे सांगत आहेत ते सत्य मानायला हवे. एखाद्याला अडचणीत आणून अशा प्रकारे ऑफर देणे कितपत योग्य आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे. देशमुख यांच्या विरोधात कुभांड रचण्यात आले. पैसे दिले नाहीत, घेतले नाहीत तरी त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचे आरोप करण्यात आले. त्यांना नाहक तुरुंगात ठेवण्यात आले. देशाची लोकशाही, न्याय व्यवस्था यासाठी ही काळजी करण्याची व चिंतेची बाब आहे अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अनिल देशमुखांकडे पाठवले नव्हते असा दावा समित कदम याने केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि समित कदम एकत्र असलेले अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. समित कदम हे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत असल्याचे एका फोटोत दिसत आहे. तर कदम यांना वाढदिवसानिमित्त फडणवीस शुभेच्छा देत असल्याचा एक फोटोही समोर आला आहे. त्यामुळे या दोघांचे निकटचे संबंध असल्याचे उघड झाले आहे.
फडणवीसांना फोनही लावला
समित कदमने त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. तो मला पाच ते सहा वेळा भेटला. मी फडणवीस यांचा मेसेज घेऊन आल्याचे त्याने मला सांगितले. त्याने एका लिफाफ्यात प्रतिज्ञापत्र आणले होते. त्याच्या व माझ्या भेटीचे व्हिडीओ शूटिंग आहे. मी योग्य वेळेला यासंदर्भातील व्हिडीओ जारी करेन, असेही देशमुख म्हणाले.
कोण आहे समित कदम?
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर भाष्य केले आहे. बोगस प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम याला आपल्याकडे पाठवले होते असा थेट आरोप अनिल देशमुख यांनी केला. समित कदम हा माझ्या घरी आला होता. फडणवीस यांना तुमच्याशी बोलायचे आहे असे त्याने मला सांगितले, असा दावा अनिल देशमुख यांनी या मुलाखतीत केला आहे. समित कदम हा सांगलीच्या मिरजमधील जनसुराज्य शक्ती पार्टीच्या युवा विंगचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.