महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना हटवण्यात आले असून झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधापृष्णन यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एनडीए सरकारमध्ये पहिल्यांदाच 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल तसेच प्रशासक बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनाकडून शनिवारी रात्री उशिरा 6 नवीन राज्यपाल आणि 3 राज्यपालांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री आणि 8 वेळा खासदार राहिलेले संतोष गंगवार झारखंडचे तर माजी खासदार रमण डेका यांना छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांची सिक्कीमच्या राज्यपाल पदी, आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली असून कटारिया चंदीगडे प्रशासक म्हणूनही पदभार स्वीकारणार आहेत.
संघाचे कार्यकर्ते ते राज्यपाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते राजस्थानचे राज्यपाल असा हरीभाऊ बागडे यांचा राजकीय प्रवास आहे. संभाजीनगर जिह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे बागडे यांनी मंत्रीपदापासून विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पाच वर्षे विधानसभेचे अध्यक्ष होते. फुलंब्री तालुक्याची निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
कोण आहेत सी. पी. राधापृष्णन
सी पी राधापृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. त्यांनी वयाच्या साडे सतराव्या वर्षी जनसंघाचे सदस्यत्व घेतले होते. तामिळनाडूमधील कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
यांना हटवले
कलराज मिश्रा (राजस्थान), विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड), रमेश बैस (महाराष्ट्र), बनवारीलाल पुरोहित (पंजाब-चंदीगड), अनुसुईया उईके (मणिपूर) आणि फगू चौहान (मेघालय) यांना हटवण्यात आले आहे.
अशी झाली बदली
सी.पी. राधापृष्णन (झारखंडहून महाराष्ट्र), गुलाब चंद कटारिया (आसामहून पंजाब-चंदीगड), लक्ष्मण आचार्य (सिक्कीमहून आसाम, मणिपूर) या तीन राज्यपालांना इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.