दिल्ली ते गल्ली भाज्यांनी शंभरी पार केल्याचे चित्र आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 27 जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोची किरकोळ किंमत 77 रुपये तर मुंबईसह महाराष्ट्रात 80 ते 90 रु. प्रतिकिलो होती. आता टोमॅटो 120 रुपयांवर गेला असून इतर भाज्यांचे दरही तितकेच झाले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे. इंधनाचे दरही गगनाला भिडले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाई कमी झाल्याचा दावा करणारे एनडीए सरकार तोंडावर आपटले आहे.
मुसळधार पावसामुळे भाज्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. परंतु इंधनाचे दरही कडाडल्यामुळे आणि रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे माल बाजारात पोहोचेपर्यंत भाज्या सडून जात आहेत. त्यामुळे भाज्या आणि कडधान्येही कडाडल्याचे चित्र आहे. पावसामुळे टोमॅटो, कांदा, बटाटा आणि मोठय़ा प्रमाणावर भाज्या अक्षरशः सडून गेल्या असून दिल्ली एनसीआरमध्ये तर टोमॅटो आणि अनेक भाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे.
महागाईचा दर 7.04 टक्क्यांवर
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार महागाई 7.02 टक्के ते 7.04 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. एप्रिलमध्ये महागाईचा दर 6.96 टक्के होता आणि मेमध्ये तो 7.02 टक्क्यांवर गेला. तर जूनमध्ये महागाईचा दर आणखी वाढून तो 7.04 टक्क्यांवर गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, देशात घाऊक महागाईचा दर सलग चौथ्या महिन्यातही वाढलेला असून सध्या तो 3.36 टक्क्यांनी वाढला आहे. अन्नधान्य, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेल्या मालाच्या किमती वाढल्याचे चित्र आहे.
अर्थसंकल्पातले काही कळत नाही. पण बाजारात जातो तेव्हा महागाई काय आहे ते कळते? महागाई कमी करण्यासाठी सरकार काय करत आहे, असा आमचा सवाल आहे.
– जयश्री ढवळे ( गृहिणी, विक्रोळी)
ताटातून आता भाज्या गायब होऊ लागल्या आहेत. श्रावण आहे म्हणून मांसाहार नाही. त्यामुळे तो स्वस्त होऊनही काही फायदा नाही. आता खायचे काय आणि जगायचे कसे, असा प्रश्न आहे.
– मयुरी काळे (गृहिणी, सायन)
भाजी (प्रतिकिलो)
- टोमॅटो 100 रु. 120 रु.
- भेंडी 80 रु. 120 रु.
- वांगी 70 रु. 120 रु.
- कोबी 60 रु. 80 रु.
- गवार 80 रु. 120 रु.
- घेवडा 80 रु. 110 रु.
- आले 240 रु. 280 रु.
- शिमला मिरची 60 रु. 120 रु.
100 रुपये किलोने मिळणारी चवळी 120 रुपयांवर गेली आहे तर हिरवा वाटाणाही 120 रुपयांवर गेला आहे. तूर डाळ 180 रुपये, चणा डाळ 90 रुपये तर मूग डाळही 120 रुपयांवर गेली आहे. 50 रुपये किलोने मिळणारा साबुदाणा 80 रुपये किलोवर गेला आहे, तर वरीचे तांदूळही 80 ते 100 रुपयांवर गेले आहेत.