रत्नागिरी आणि सातारा जिह्यांना जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह साताऱ्यातील 40 गावांचा संपर्प तुटला आहे. हा घाट रस्ता धोकादायक असून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने प्रशासनाकडे करूनही त्यावर काहीच उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळेच जीव धोक्यात घालून सध्या स्थानिक या घाटातून प्रवास करत आहेत. यात नियमित ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांचाही समावेश असून लाडक्या बहीण भावांच्या लेकरांना असलेला धोका तुम्हाला दिसत नाही का, मुख्यमंत्री त्यांच्या गावाकडे जाणारा रस्ताही नीट करू शकत नाहीत का, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
रघुवीर घाट हे पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर आहे. शेकडो पर्यटक या घाटात येत असतात. पावसाळ्यात ही संख्या मोठी असते. त्यातच चारच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे घाटातील दरीकडील भाग खचल्याने सातारा जिह्यातील 40 गावांचा संपर्क तुटला आहे. साताऱ्यातील शिंदी, वळवण, चाट, वाधावळे, लामज, मोरनी, आरव, अकल्पे, तापोळासह 40 गावांचा संपर्प खेड आणि चिपळूण तालुक्यांशी येतो. हे ग्रामस्थ बाजारहाट करण्यासाठी नियमितपणे रघुवीर घाट मार्गे प्रवास करतात. मात्र रस्ता खचल्याने या 40 गावांची काsंडी झाली आहे. रघुवीर घाटातील खचलेल्या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
सरकार जनतेच्या जिवाशी खेळतंय
रघुवीर घाटातील रस्ता धोकादायक असल्याबाबत दोन वर्षांपासून ग्रामस्थ प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीही याबाबत स्मरणपत्र देण्यात आले. मात्र रस्ता दुरुस्त करण्याबाबत कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळेच रस्ता खचण्याची आफत ओढवली आहे. घाटातील रस्ता खचला तरीही वाहतूक बंद केलेली नसून सरकार जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पर्यटकांनाही भीती
पावसाळ्यात अनेक पर्यटक रघुवीर घाटात येत असतात. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली पर्यटक चिंब होतात. कोयना अभयारण्यात फिरण्याचा आनंद लुटतात. मात्र रघुवीर घाटातील रस्त्याला भगदाड पडल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
वाहतूक बंद करून उपाययोजना करा
रस्ता खचल्याने रघुवीर घाटातील वाहतूक बंद करावी आणि त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खोपी गावचे सरपंच यशवंत भोसले आणि संजय आखाडे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
या विभागातील अनेक विद्यार्थी हे शाळेसाठी खेड तालुक्यातील खोपी गावात एसटीने येतात. आता घाटातील रस्ताच खचल्याने जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.
जीवितहानी झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार!
सरकार जाहिरातबाजीवर करोडो रुपये खर्च करत आहे; पण जनतेच्या जिवाचे सरकारला काहीच पडलेले नाही, असे नमूद करतानाच जो मुख्यमंत्री स्वतःच्या गावाला जोडणारा रस्ता नीट करू शकत नाही त्यांनी विकासाच्या बाता करू नयेत, असे खडेबोल या परिसरातरील गावकऱ्यांनी सुनावले. रघुवीर घाटात दुर्घटना घडून जीवितहानी झाली तर त्याला पूर्णपणे मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार असेल, असेही ग्रामस्थांनी ठणकावले.