Ai ची कमाल! प्रिमॅच्युअर जन्माचे रहस्य उलगडण्यास हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना मोठे यश

बालमृत्यू तसेच अपंगत्वाचे प्रमुख कारण ठरणाऱ्या अकाली अर्थात प्रिमॅच्युअर जन्मामागील रहस्य उलगडण्यात हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) शास्त्रज्ञांना हे यश आले आहे. देशातील काही आघाडीच्या शास्त्रज्ञांनी AI च्या मदतीने अनुवंशिक प्रकरणांचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातून प्रिमॅच्युअर जन्म होण्यामागील विविध कारणांचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या आधारे अधिक संशोधन सुरू ठेवल्यास सध्या चिंताजनक पातळीवर असलेला अकाली जन्मदर कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

प्रिमॅच्युअर जन्माचा मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत यांसारख्या अवयवांची वाढ आणि विकासावर मोठा परिणाम होतो. नऊ महिन्यांच्या पूर्ण कालावधीनंतर जन्मलेल्या बाळांपेक्षा अकाली जन्म झालेल्या बाळांच्या प्रकृतीच्या विविध तक्रारी असतात. अशा बाळांना श्वसन तसेच अन्य प्रकारच्या गंभीर विकारांचा धोका अधिक असतो. याचा बाळांच्या विकासावर मोठा परिणाम जाणवत असतो. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी AI अनुवंशिक अभ्यासात मोठे पाऊल टाकले आहे. या संदर्भातील देशातील पहिल्यावहिल्या अभ्यासात तीन सूक्ष्मजीव, तीन जीन्स आणि तीन सूक्ष्मजंतू मार्ग आढळून आले आहेत.

याच सूक्ष्मजीव, जीन्स आणि जिवाणू मार्गांमुळे अकाली अर्थात मुदतपूर्व जन्माचा धोका अधिक असतो. हाच धोका ओळखून परळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ (NIRRCH), नवी दिल्लीची हिंदुस्थानी वैद्यकीय संशोधन परिषद बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्स आणि नोएडाची एमिटी इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त पुढाकारातून अनुवंशिकतेचा अभ्यास करण्यात आला आहे.

देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक सहापैकी एक बाळ हे नऊ महिन्यांच्या आधीच जन्माला येते. अशा प्रिमॅच्युअर प्रसूतीमागील कारण अनेकदा माहीत नसते. योनीमधील सूक्ष्मजीव संक्रमणामुळे अकाली जन्म होऊ शकतो, असे काही तज्ञांचे मत आहे. मात्र या मताबाबतही पुरेशी स्पष्टता नाही.