>> महेश उपदेव
नागपूरचे ज्येष्ठ मराठी उद्योजक, दिवाडकर्स अजित बेकरीचे संचालक व ज्येष्ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांचे नुकतेच निधन झाले. मराठी उद्योजक, कला क्षेत्रातील नाटय़ दिग्दर्शक व उमदा कलावंत हरवला आहे अशी भावना विदर्भात व्यक्त केली जात आहे.
लहानपणापासूनच नाटय़ कलेची आवड असणाऱ्या अजित दिवाडकर यांनी वडील प्रभाकर दिवाडकर यांच्या दिग्दर्शनात अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. उत्तम निरीक्षण क्षमता व अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांचा अभिनय बहरतच गेला. पूर्वीच्या धनवटे रंगमंदिरमध्ये कँटीनचा व्यवसाय करत असतानाच त्यांचा नाटय़ प्रवासही दमदारपणे सुरू राहिला. त्यांनी महाविद्यालयात शिकत असताना अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या व पारितोषिकेही पटकावली. आकाशवाणी, दूरदर्शनवरील अनेक श्रुतिकांमध्ये त्यांनी काम केले. आजोबा जगन्नाथ दिवाडकर यांनी 1910 साली शिक्षकाची नोकरी सोडून व्यवसायची वाट धरली. दिवाडकर ब्रदर्स आणि सदाशिव अॅण्ड कंपनी या नावाने कंपनी स्थापन करून त्यांनी रेल्वेचे कंत्राट मिळवले. कल्याण रेल्वे स्थानकावर पहिला स्टॉल थाटला आणि हळूहळू हा प्रपंच नागपूरपर्यंत पोहोचला.
प्रभाकर दिवाडकर यांनी 1955 मध्ये सीताबर्डी येथील मशीदजवळील गल्लीत अजित बेकरी सुरू केली. अजित दिवाडकर यांचे वडील प्रभाकर दिवाडकर 1955 मध्ये नागपुरात आले. टी स्टॉलवर लागणाऱ्या पदार्थांचा पुरवठा स्वतःच सुरू केला. हा उद्योग अजित यांनी पदवीधर झाल्यानंतर वाढविला. बेकरीचे आधुनिकीकरण करण्याकरिता त्यांनी सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून बेकरी टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अजित बेकरीच्या ब्रेडला मागणी वाढल्यानंतर त्यांनी 1987 मध्ये बेकरीचे प्रॉडक्शन सिताबर्डी येथून वर्धा रोड येथील नवीन जागेत हलविले. धरमपेठ व गोकुळपेठ येथे अजित बेकरीचे आऊट लेट असून विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्येही आऊट लेट सुरू झाले आहेत. अजित बेकरीचे नमकीन पुण्यापर्यंत पोहोचले आहे. आता तर परदेशातूनही मागणी होत आहे.
1955 साली अजित बेकरी सुरू करणाऱ्या दिवाडकर यांनी अतिशय कष्टाने हा व्यवसाय उभा केला आणि नावारूपाला आणला. त्यांना जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. व्यवसाय सांभाळत असतानाच त्यांनी नाटक, वाचन, अभिवचन, क्रिकेटाचाही छंद जोपासला.
अजित दिवाडकरांना अभिनयाचा वारसा आई-वडिलांकडून मिळाला. दिवाडकर यांनी अनेक नाटकांमध्ये कामे केली आहेत. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘मेरु मंदार धाकुटे’ या नाटकात त्यांनी प्रथम काम केले. त्या वेळी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिकही मिळाले. ‘भ्रमाचा भोपळा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘अंमलदार’ अशा कितीतरी नाटकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत वैयक्तिक अभिनयाचा पहिला पुरस्कार अजित दिवाडकर यांची आई नलिनी दिवाडकर आणि वडील प्रभाकर दिवाडकर यांनी प्राप्त केला होता, हे विशेष.