Nagar News : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे युवा शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे ही संतापजनक घटना घडली आहे. रवींद्र बाळासाहेब पाटोळे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पाटोळे याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

पाटोळे आपल्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. पाटोळे याने दोन-तीन दिवसांपूर्वी महावितरणकडे तोंडी तक्रार दिली होती. शेतातील वीजेच्या खांबाला शॉक लागत असून लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी विनंती पाटोळे याने महावितरणकडे केली होती. मात्र महावितरणने याकडे कानाडोळा केला.

महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे पाटोळे याचा नाहक बळी गेला. शॉक लागल्यानंतर उपचारासाठी त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जेऊर येथील ग्रामस्थांनी महावितरणाच्या भोंगाळ कारभाराचा निषेध केला आहे.

संतप्त ग्रामस्थांनी पाटोळे याचा मृतदेह जेऊर येथील महावितरणाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवत निषेध केला. जेऊरमधील ही चौथी घटना आहे.