विदर्भात भाजपला एकाच दिवशी दोन धक्के; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश, तर माजी खासदाराचा राजीनामा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात दमदार कामगिरी केली. विशेषत: भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात महाविकास आघाडीने सुरुंग लावत 10 पैकी 7 जागांवर विजयश्री खेचून आणली. या निकालापासून विदर्भातील वारे फिरले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. एकामागोमाग एक भाजपचे नेते पक्षाला रामराम करत महाविकास आघाडीची कास धरत आहेत. शुक्रवारीही विदर्भात भाजपला दोन मोठे धक्के बसले. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला, तर माजी खासदार शिशुपाल पटले भाजपला रामराम ठोकला आहे.

रमेश कुथे यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचेही पक्षामध्ये स्वागत केले.

दरम्यान, रमेश कुथे यांनी 2019मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण भाजपमध्ये शिवसेनेसारखे प्रेम आणि आदर न मिळाल्याने त्यांनी पुन्हा घर वापसी करण्याचा निर्णय घेतला. कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे गोंदिया मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

विदर्भात महाविकास आघाडीचं वर्चस्व

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विदर्भात भाजपला जोरदार धक्का देत 10 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेच्या संजय देशमुख यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर वर्धा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अमर काळे विजयी झाले होते. अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे, रामटेकमधून श्याम बर्वे, भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून नामदेव किरसान आणि चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या होत्या.