गेले दोन दिवस मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे समुद्रालाही उधाण आले होते. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जेएसडब्लूच्या मालवाहू जहाजात गुरुवारी तांत्रिक बिघाड झाला. यामुळे कुलाबा किल्ल्याजवळ समुद्रात हे जहाज बंद पडले होते. बंद पडलेल्या जहाजावरील कामगारांचे कोस्टगार्डकडून हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य राबवण्यात आले होते.
बंद पडलेल्या जहाजावर काही कामगार अडकले होते. या कामगारांची सुटका करण्यासाठी कोस्टगार्डकडून बचाव कार्य राबवण्यात आले होते. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने 14 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सर्व कामगारांना अलिबाग समुद्र किनारी आणून सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
जेएसडब्लू कंपनीचे मालवाहू जहाज 25 जुलै रोजी धरमतर खाडीतून जयगडकडे कोळसा घेऊन निघाले होते. मात्र पावसामुळे काही तांत्रिक बिघाड झाल्याने भर समुद्रात हे जहाज बंद पडले होते.