संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे धुमशान सुरू असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहराला पाण्याने वेढा घातला असून कोल्हापुरालाही महापुराची भीती कायम आहे. गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी नऊच्या सुमारास पंचगंगा नदीने 43 फुटांची धोका पातळी गाठली. पाठोपाठ राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
राधानगरी धरण शंभर टक्के भरल्याने गुरुवारी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
धरणातून सध्या 2 हजार 928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या पावसात राधानगरी धरण भरल्यानंतर प्रथमच स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना महापुराची भीती कायम राहिली आहे.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसण्यास कारणीभूत असलेल्या कर्नाटकातील 91.263 टीएमसी क्षमतेच्या अलमट्टी धरणातून सध्या 2 लाख क्युसेक विसर्ग होत आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण शंभर टक्के भरल्याने गुरुवारी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. #Kolhapur #radhanagaridam pic.twitter.com/pouYSuwu5s
— Saamana (@SaamanaOnline) July 25, 2024
ऐतिहासिक कळंबा तलाव ओसंडला,पाणी सांडव्या बाहेर
शहराची गेली 141 वर्षे अखंडितपणे तहान भागवणारा शाहूकालीन ऐतिहासिक कळंबा तलाव यंदाच्या पावसात प्रथमच बुधवारी सकाळी पाणी सांडव्यातून बाहेर पडला. कळंबा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे अवघ्या सात दिवसातच हा तलाव पूर्णक्षमतेने भरला. कोल्हापूर महानगरपालिके तील 25 टक्के शहरी भाग तसेच संपूर्ण कळंबा गावाला या तलावातून पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी सुटल्याने नागरिक व प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.