लोणावळा येथे आज ढगफुटीसारखा भयंकर पाऊस झाला. त्यामुळे सखल भाग आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यंदाच्या वर्षी लोणावळय़ात झालेला हा सर्वाधिक पाऊस म्हणून नोंदला गेला. लोणावळय़ात काही दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने पर्यटकांनी तूर्त तिथे जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
लोणावळय़ात मंगळवारपासून तुफान पाऊस सुरू आहे. सोसाटय़ाच्या वाऱयासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. कार्ला, मळवली, सदापूर भागांमध्ये इंद्रायणीच्या पात्रातील पाणी पसरल्याने देवले ते मळवली रस्त्यावर दोन फूट पाणी साचले होते. त्या पाण्यामधूनच पादचारी आणि वाहनांना मार्ग काढावा लागला.
मळवली परिसरात सखल भागात पाणी साचल्याने एका बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडपून पडले होते. त्यांना बाहेर तुफान पाऊस होतोय याची कल्पनाच नव्हती. सकाळी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्का बसला आणि आपण अडपून पडल्याची जाणीव झाली. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सहाय्याने त्या पर्यटकांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.