बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर 14 एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना बेड्याही ठोकल्या. याप्रकरणी सलमान खानचाही जबाब नोंदवण्यात आला होता. या जबाबात सलमानने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली होती.
सलमान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. यात सलमानच्या जबाबाची प्रतही जोडण्यात आली आहे. 4 जून रोजी मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने सलमानचा जबाब नोंदवला होता.
काय म्हटलंय सलमान खानने जबाबात?
मी व्यवसायाने फिल्मस्टार आहे आणि गेल्या 35 वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. अनेक प्रसंगी माझ्या हितचिंतकांची आणि चाहत्यांची गर्दी वांद्रे येथील माझे घर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ जमते. त्यावेळी माझ्या चाहत्यांवरील माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी मी माझ्या फ्लॅटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून त्यांना हात दाखवतो. तसेच, माझ्या घरी पार्टीनिमित्त आलेला माझा मित्रपरिवार, माझे वडील यांच्यासोबत मी बाल्कनीत गप्पा मारत बसतो. माझे काम आटोपल्यानंतर किंवा सकाळी लवकर उठल्यावर ताजी हवा घेण्यासाठी मी बाल्कनीत जातो. मी स्वतःसाठी खासगी सुरक्षा देखील घेतली आहे.
2022 मध्ये माझ्या वडिलांना अपार्टमेंटच्या पलीकडील बाकावर एक पत्र मिळाले होते. या पत्रात मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी माझ्या वडिलांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर मार्च 2023 मध्ये मला माझ्या अधिकृत ई-मेल आयडीवर माझ्या टीमच्या एका कर्मचाऱ्याकडून एक मेल आला होता. यात लॉरेन्स बिश्नोई प्रमाणेच मला आणि माझ्या कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. माझ्या टीमने याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
या वर्षी जानेवारी महिन्यात खोटी नावे आणि ओळखपत्र घेऊन पनवेलमधील माझ्या फार्महाऊसमध्ये दोघांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. माझ्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन्ही गुन्हेगार राजस्थानमधील फाजिल्का गावातील असून ते लॉरेन्स बिश्नोईचेही गाव आहे, असे मला पोलिसांकडून समजले.
मी माझ्यासोबत असलेल्या सर्वांना, माझे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले आहे. मला मुंबई पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिली आहे. माझ्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित पोलीस, अंगरक्षक, खासगी सुरक्षा अंगरक्षक नेहमी माझ्यासोबत असतात.
14 एप्रिल 2024 रोजी मी झोपेत असताना सकाळी 4.55 वाजता मला फटाक्यांचा आवाज ऐकू आला. मात्र पोलीस अंगरक्षकाने सांगितले की दुचाकीवरून आलेल्या दोन लोकांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत बंदुकीतून गोळीबार केला आहे. याआधीही मला व माझ्या कुटुंबाला इजा करण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतल्याचे मला समजले आहे. मला खात्री आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने माझ्या बाल्कनीत गोळीबार केला होता.
14 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याबाबत माझ्या अंगरक्षकाने वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांनी फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचेही मला कळले आहे. याआधी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीने एका मुलाखतीत मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याबाबत वक्तव्य केले होते. यामुळे मला खात्री आहे की माझे कुटुंबीय झोपेत असताना लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या टोळीच्या साथीदारांच्या मदतीने हा गोळीबार केला. मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याची त्याची योजना होती, त्यासाठी त्याने हा हल्ला केला, असे सलमान खानने आपल्या जबाबात म्हटले आहे.