बोगस कंपनी, फसवणूक; सर्वकाही स्क्रीप्टनुसार सुरु होते, पण सीआयडीने ‘असा’ केला टोळक्याचा पर्दाफाश

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांना करोडोचा चुना लावणाऱ्या एका सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यास पश्चिम बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागा(CID)ला यश आले आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली या टोळीने लोकांना हजारो कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीतील दोन सूत्रधारांना पश्चिम बंगाल सीआयडीने दिल्ली आणि हरयाणा येथून अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. हरयाणातील मानुष कुमार आणि दिल्लीतील सत्येंद्र महतो अशी आरोपींची नावे आहेत.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, या टोळीने गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशपासून दिल्ली आणि हरयाणापर्यंत आपले फसवणुकीचे जाळे पसरवले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना तब्बल 1000 कोटींचा चुना लावला आहे.

व्हॉट्स ॲप, टेलिग्राम आणि फेसबुक मेसेंजर आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही टोळी लोकांशी संपर्कात यायची. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या लोकांना टार्गेट करत आरोपी एक ग्रुप तयार करायचे आणि मग त्यांची फसवणूक करायचे.

अशी करतात फसवणूक?

सर्वप्रथम हे ठग सोशल मीडियावर झटपट अधिक पैसा कमवण्यात स्वारस्य असणाऱ्या लोकांना हेरतात. मग सोशल मीडियावर त्यांचा एक ग्रुप तयार करतात. यानंतर ग्रुप अॅडमिन ग्रुपमध्ये काही गुंतवणूक योजनांचे प्लान शेअर करतो. मग टोळीचाच भाग असलेले ग्रुपमधील काही लोक संभाषण सुरु ठेवण्यासाठी सदर योजनांबाबत अॅडमिनशी संवाद साधतात. तसेच आपले अनुभव शेअर करतात. आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्याला गुंतवणुकीवर नफा मिळाल्याचे सांगतात. यामुळे ग्रुपमधील नवीन सदस्य या गुंतवणूक योजनांकडे आकर्षित होतात.

टोळीने बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेक बोगस कंपन्या सुरु केल्या होत्या. क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास थेट परदेशात जातो. क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे गुंतवणे खूप कठीण असल्याने टोळीने बोगस कंपन्यांचा पर्याय अवलंबला. लोकांची फसवणूक करून मिळवलेले पैसे ही टोळी विविध बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असे.

‘असा’ उघडकीस आला गुन्हा

एका व्यक्तीने 43 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल चंदननगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास पश्चिम बंगाल सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान सायबर पोलिसांना एका शेल कंपनीची माहिती मिळवली, ज्यात घोटाळ्याचे पैसे गुंतवण्यात आले होते. या कंपनीच्या बँक तपशीलांची तपासणी केल्यानंतर सदर घोटाळा उघडकीस आला. यानंतर सीआयडीने या बोगस कंपनीच्या दोन संचालकांची ओळख पटवली आणि छापेमारी करत कंपनीच्या दोन सूत्रधारांना अटक केली आहे. या घोटाळ्याचा अधिक तपास सुरु आहे.