बारावीत नापास, नीटमध्ये मिळाले 705 गुण, निकालामुळे शिक्षकही आश्चर्यचकित

नीट परीक्षेच्या गोंधळानंतर एनटीएने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा शहरनिहाय परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. परंतु अजूनही यातील घोळ संपला नाही, असेच चित्र समोर आले आहे. गुजरातमधील एका बारावीच्या नापास झालेल्या विद्यार्थिनीला 720 पैकी 705 गुण मिळाले आहेत. विद्यार्थिनीच्या या निकालामुळे तिचे शिक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. अहमदाबादमधील ही विद्यार्थिनी असून ती बारावीच्या परीक्षेत चक्क नापास झाली होती. परंतु आता तिला नीटमध्ये 705 गुण मिळाले आहेत. या विद्यार्थिनीची मार्कशीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. दोन्ही मार्कशीटमधील फरक पाहून अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्व पराक्रम हे गुजरातमध्येच का होतात? असा सवालही सोशल मीडियावरून विचारला जात आहे.