आता हे लाडकी मेहुणी योजनाही आणतील! मनोज जरांगे यांचा मिंध्यांवर हल्ला; आंतरवालीत बेमुदत उपोषण सुरू

राज्य सरकार आरक्षणाबद्दल गंभीर नाही. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. गोड बोलून मराठा समाजाचा काटा काढण्याचे कारस्थान आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली. आता लाडकी मेहुणी योजनाही आणतील, असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी मिंधे सरकारवर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अशा योजनांची घोषणा करण्यात येत आहे. एकदा निवडणुका झाल्या की या सगळ्या योजनाही डब्यात जातील, असेही जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी आदी दहा मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले. जरांगे यांच्या आंदोलनाचा हा पाचवा टप्पा आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मिंधे सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका संशयास्पद आहे. निवडणुका आल्यात म्हणून लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या योजना आणल्यात. निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील. खरे तर सरकारने लाडकी मेहुणी, लाडका मेहुणा अशा योजनाही आणाव्यात, असा टोलाही मनोज जरांगे यांनी लगावला.

‘लाडकी बहीण’ विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे निघत नाहीत. या योजनांचे अर्ज भरण्यासाठी, त्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी होणार्‍या गर्दीमुळे सेतूसुविधांवर ताण येत आहे. फुकट योजना आणून आरक्षणाच्या प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्याचे पाप सरकार करत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

गृहमंत्र्यांची चुटकी कुठे गेली
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुटकी वाजवून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला होता. आता वर्ष उलटत आले पण एकाही आंदोलकावरील गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. कुठे गेली फडणवीसांची चुटकी? असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला.

शांतता रॅली होणारच
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठा आरक्षण शांतता रॅलीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ठरल्याप्रमाणे या सर्व रॅली होणार असून, मी देखील या रॅलीत रुग्णवाहिकेतून सहभागी होणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर 20 ऑगस्टपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांचा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठी राज्यातील इच्छुकांनीही यावे असे आवाहनही त्यांनी केले. 20 ते 27 ऑगस्टदरम्यान होणार्‍या या बैठकांना सर्व समाजाला आमंत्रण असल्याचेही ते म्हणाले. 29 ऑगस्टला आंदोलनाची वर्षपूर्ती आहे. या दिवशी राज्यातील मराठा समाजबांधवांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यूपीएससीत असे होत असेल तर…
वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर प्रकरणाबद्दल आपण बोलणार नाही, पण यूपीएससीत असे गैरप्रकार होत असतील तर अत्यंत कठीण आहे असे मनोज जरांगे म्हणाले. हे एकच प्रकरण नाही, इतर अनेक प्रकरणे असू शकतात असेही ते म्हणाले.

मार्क मिळवूनही उपयोग नाही
घनसावंगी येथील भगवती देशमुख या विद्यार्थिनीने मनोज जरांगे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाहीत. दहा दिवसांत कागदपत्रे कशी मिळवायची? असे सांगताना तिला रडू फुटले. आमचे आई-वडील लाखो रुपये फिस देऊ शकत नाहीत. आम्ही मार्क मिळवूनही उपयोग नाही. सरकार म्हणते दहा टक्के आरक्षण दिले आहे, मग ते अंमलात का येत नाही असा सवाल या विद्यार्थिनीने केला.

तहसीलदारांची विनंती फेटाळली
जालना जिल्हाधिकार्‍यांचे पत्र घेऊन अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. उपोषण थांबवावे अशी विनंती त्यांनी केली. मात्र मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.