सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गुरूवारी व शुक्रवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये किरकोळ पडझड होऊन सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यात 83 मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत पावसाने दोन हजाराचा (2089) टप्पा पार केला आहे.
देवगड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी व रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड होऊन सुमारे 1 लाख 58 हजार 100 रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये दाभोळे गणेश नगर येथील बाळकृष्ण आत्माराम राऊत यांच्या मांगराचे पत्रे उडून सुमारे 21 हजार, चाफेड येथील प्रवीण शिवाजी राणे यांच्या कंपाउंडची संरक्षक भिंत कोसळून सुमारे 1 लाख, (गिर्ये) बांदेगाव येथील शंकर हरी पोसम यांच्या घराचे पत्रे फुटून सुमारे 2 हजार 600 आणि मिठबाव देऊळवाडी येथील पुंडलिक आचरेकर यांचा गोठा कोसळल्याने सुमारे 34,500 रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर अजून सुरूच आहे. तसेच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .