जरांगेंवर टीका करणाऱ्या बारसकर यांची गाडी पेटवली

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे, लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांच्यावर आरोप करत त्यांची बदनामी करणारे एकवेळ त्यांचे सहकारी असलेले अजय महाराज बारस्कर यांची चारचाकी गाडी आषाढी यात्रेत जळाली आहे. यामागे मनोज जरांगे-पाटील समर्थक असल्याचा आरोपही बारस्कर यांनी केला आहे. ही घटना बुधवारी एकदशी दिवशी मध्यरात्री 2 वाजता घडली आहे.

मनोज जरांगे -पाटील यांना विरोध करणाऱया अजय महाराज बारस्कर (44, रा. भंडारा डोंगर, सदुवडी देहू, ता.मावळ जि. पुणे) यांची (एम.एच. 12 बी.पी. 2001) ही चारचाकी गाडी पंढरपूर येथे 65 एकर परिसरात पार्ंकगमध्ये लावण्यात आली होती. बारस्कर यांना दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने गाडी जळाली की जाळली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली. कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे. दहा लाख रुपये किंमत असलेल्या कारचे एक लाखाचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितले आहे. पोलीस आता या परिसरात असणाऱया सीसीटीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करीत आहेत.

मनोज जरांगे-पाटील यांच्यावर मी काही आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मला सतत धमक्या येत आहेत. माझी कार जरांगे-पाटील यांच्या समर्थकांनी जाळली आहे. याबाबत मला खात्री आहे. याबाबत मी पोलिसांना सांगितले आहे.

 अजय महाराज बारस्कर