प्रसाद लाड… कोण हा बांडगूळ? मनोज जरांगेंनी धू धू धुतले!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेणे महागात पडले. मनोज जरांगे यांनी लाड यांना धू धू धुतले! ‘प्रसाद लाड… कोण हा बांडगूळ?’ असा सवाल करत ‘पैशाची मस्ती मराठ्यांना दाखवू नका. फडणवीसांची गुलामी करताय, तीच तुमची लायकी आहे!’ असे खडे बोलही जरांगे यांनी लाड यांना सुनावले.

भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फडणवीसद्वेषाचा रोग झाल्याची वटवट केली होती. आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांची सालटीच काढली. हा कोण बांडगूळ आहे? फडणवीसांचा माणूस आहेस ना, मग त्याची धुणी धूत बस. आमच्या नादाला लागू नको, असा खरमरीत इशारा जरांगे यांनी दिला. फडणवीसांबद्दल एवढे प्रेम असेल तर त्यांच्यासोबत राहा, पैशाची मस्ती आम्हाला दाखवू नको, असेही जरांगे म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याचा एवढा राग येतो. आमची मुले आरक्षण नसल्यामुळे जगाच्या स्पर्धेत किती मागे पडली आहेत. तुम्हाला याची जाणीव आहे का? कुणबी प्रमाणपत्र असतानाही ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांनी मराठा मुलांना भरती प्रक्रियेतून बाहेर काढले. हिंमत असेल तर यावर बोला!’ असे आव्हान यावेळी मनोज जरांगे यांनी दिले. मी जातीसाठी लढत आहे. जातीचे भले व्हावे असे मला वाटते, असे खडे बोल जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांनाही सुनावले. दरेकर यांनी आंतरवालीत यावे, समोरासमोर चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

२० जुलैपासून उपोषण

२० जुलैपासून मी आमरण उपोषण सुरू करणार आहे. सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही आणि उपोषण सुरूच राहिले तर मी रुग्णवाहिकेमधून रॅलीत सहभाग नोंदवणार आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. यावेळी राज्यात कुठेही आंदोलन, उपोषण होणार नाही. फक्त आंतरवाली सराटीतच उपोषण होईल, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर २८८ उमेदवार उभे करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शांतता रॅलीचा दुसरा टप्पा जाहीर; प्रारंभ सोलापुरात, तर समारोप नाशिकमध्ये
मनोज जरांगे यांनी आज मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीचा दुसरा टप्पा जाहीर केला. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ही रॅली काढण्यात येणार आहे. ७ ऑगस्ट रोजी सोलापुरात रॅली काढण्यात येणार असून १३ ऑगस्ट रोजी नाशिक येथे समारोपाची रॅली काढण्यात येईल, असे जरांगे म्हणाले.

सोलापूर – ७ ऑगस्ट
सांगली – ८ ऑगस्ट
कोल्हापूर – ९ ऑगस्ट
सातारा – १० ऑगस्ट
पुणे – ११ ऑगस्ट
नगर – १२ ऑगस्ट
नाशिक – १३ ऑगस्ट