एकीकडे सामान्यांचा जीव जातोय आणि सरकार श्रीमंतांच्या बुलेट ट्रेनच्या मागे आहे, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

उत्तर प्रदेशात गुरुवारी दुपारी मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. चंदीगडहून गोरखपूरला जाणाऱ्या चंदीगड एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. एकीकडे सरकार रेल्वे अपघात रोखण्यासाठी पाऊले उचलत असल्याचा दावा करत असली तरी सतत होणारे रेल्वे अपघात चिंतेचे कारण बनत चालले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला व रेल्वे मंत्रालयाला फटकारले आहे.

”एकीकडे देशाचे रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक प्रमुख अश्विनी वैष्णवजी आपला वाढदिवस साजरा करत आहेत, तर दुसरीकडे आजच पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झालाय. दिब्रुगढ-चंदिगढ एक्सप्रेसला झालेल्या अपघाताची बातमी अस्वस्थ करणारी आहे. एकीकडे आधुनिकतेच्या थापा मारायच्या आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांच्या दळणवळणाचं महत्वाचं माध्यम असलेल्या रेल्वेच्या सुरक्षेकडे कानाडोळा करायचा, असं बराच काळ सुरू आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन्स असोत, की देशभरातल्या लांब पल्ल्याच्या गाड्या… अपघातात जीव सामान्यांचा जातोय आणि सरकार मात्र श्रीमंतांच्या बुलेट ट्रेनच्या मागे आहे” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.