दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती त्यामुळे जामीन मिळूनही ते अद्याप तुरुंगातच आहेत. सध्या तुरुंगात अरविंद केजरीवाल यांचे वजन झपाट्याने घटत असून त्यांच्या रक्तातील साखर देखील कमी होत आहे. त्यामुळे ते कोमात जाऊ शकतात किंवा त्यांचा जीवही जाऊ शकतो असा आरोप आपने केला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ”अरविंद केजरीवाल यांचा घात करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
”अरविंद केजरीवाल यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होतेय. त्यांना अनेक आजार आहेत. त्यांना ईडीने जामीन दिलाय तरीही त्यांना तुरुंगात ठेवलंय. हे एक षडयंत्र आहे. जसं महाराष्ट्रात स्टेन स्वामीला मारलं गेलंय तसंच तुरुंगात केजरीवालांचा घात करण्याचा कट रचला जातोय. याबाबत मला माहिती मिळाली आहे व ती गंभीर आहे, असे संजय राऊत म्हणाले.