‘मातोश्री’वर शंकराचार्यांच्या पादुकांचे विधिवत पूजन, उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आशीर्वाद

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शंकराचार्यांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी शंकराचार्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देतानाच उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवून वेदोक्त मंत्रोच्चारात शुभाशीर्वाद दिले.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे आपल्या शिष्यगणांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी आज सकाळी आगमन झाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांना वंदन करत त्यांचे ‘मातोश्री’मध्ये स्वागत केले. यावेळी शंकराचार्यांचे औक्षण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

शंकराचार्य यांच्या आगमनानिमित्त आज ‘मातोश्री’वर मंगलमय वातावरण होते. शंकराचार्यांच्या पादुकांचे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब पूजन केले. शंकराचार्यांच्या शिष्यगणांनी यावेळी वेदमंत्रांचे उच्चारण केले. पादुका पूजनानंतर शंकराचार्यांनी ठाकरे कुटुंबीयांना आयुष्यमान भव, विजयी भव, असा आशीर्वाद प्रदान केला. तसेच प्रसादही दिला. यावेळी शंकराचार्यांच्या वतीनेही उद्धव ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आमदार मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते.