कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळल्याने रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कोकण रेल्वे तब्बल 17 तास ठप्प आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने दिवाणखवटीतील दरड हटविण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. कोकण रेल्वेने रविवारी थांबविलेल्या सर्व गाड्या सोमवारी सकाळी रद्द केल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने एसटी महामंडळाकडून 68 बस घेतल्या आहेत. दरम्यान काही प्रवाशांनी खासगी गाड्या करून मुंबईकडे प्रवास सुरू केला.
दिवाणखवटीत दरड कोसळल्याने काल सायंकाळी तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकात,मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात,सावंतवाडी-दिवा दिवाणखवटी स्थानकात,कोचुवली चिपळूण स्थानकात थांबविण्यात आली होती. आज सकाळपर्यंत प्रवाशांचा गाडीतच खोळंबा झाला. रत्नागिरीत प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली होती.रेल्वेमार्ग सुरू होईल म्हणून प्रवासी गाडीत बसून सकाळ पर्यंत वाट पहात होते.अखेर सकाळी या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.प्रवाशांना मुंबईत सोडण्यासाठी रेल्वेने एसटीच्या 68 बस मागवल्या आहेत. त्यापैकी 40 बस रत्नागिरी रेल्वेस्थानक, चिपळूण 18 आणि खेड स्थानकात 10 बस पाठविण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, रत्नागिरी-दिवा पॅसेंजर, जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, मुंबई -मंगळूर एक्सप्रेस आणि सावंतवाडी-मडगाव एक्सप्रेस रद्द केली आहे.