बॅग भरलेली होती, घरी जायची तयारी झालेली; त्याआधीच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील मोंगबुंग गावात रविवारी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) अजय कुमार झा हे जवान शहीद झाले. झा हे मूळचे बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी असून सुट्टीवर घरी परतण्यासाठी अवघे काही तास बाकी असतानाच झा शहीद झाले आहेत. त्यामुळे घरी परतण्याच्या तयारी असलेल्या झा यांचे पार्थिव शरीरच आता त्यांच्या मूळ गावी पोहोचणार आहे.

अजय कुमार झा यांच्या सोबतच्या एका जवानाने त्यांच्या खोलीचा व्हिडीओ शेअर केला असून झा यांच्या पलंगावर त्यांची सामानाने भरलेली बॅग त्यांनी या व्हिडीओ दाखवली आहे. ”त्याने त्याचे सर्व कपडे बॅगमध्ये भरले होते. उद्या आपल्या घरी जाणार म्हणून तो खूष होता’, असे त्या व्हिडीओतला जवान सांगत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून नेटकरी देखील हेलावून गेले आहेत.

रविवारी मणिपूर पोलीस आणि सीआरपीएफचे पथक संयुक्त गस्त घालत असताना संशयित बंडखोरांनी जिरीबाममध्ये जवानांच्या गाडीवर हल्ला केला. अजय कुमार हे पथकाची एसयूव्ही गाडी चालवत होते. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात त्यांच्या डोक्याला गोळी लागल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मुख्यमंत्री बिरेन यांचे कुकी अतिरेक्यांकडे बोट

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी एक्सवर या हल्ल्याचा निषेध केला आहे. आज जिरीबाम जिह्यात कुकी अतिरेकी असल्याचा संशय असलेल्या सशस्त्र गटाने केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफ जवानाच्या हत्येचा मी तीव्र निषेध करतो, असे म्हणताना त्यांनी कुकी अतिरेक्यांकडे बोट दाखवले आहे.

कुकी आणि मैतेई यांच्यातील चकमकी सुरूच

जिरीबाम जिह्यात अनेक भागात कुकी आणि मैतेई आदिवासी संघटनांच्या सशस्त्र गटांमध्ये चकमकी होत आहेत. 13 जुलैच्या रात्रीही मोंगबुंग गावात गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता, असे एका अधिकाऱयाने सांगितले. शेजारील डोंगरी भागातून मोंगबुंग येथे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, असे आणखी एका अधिकाऱयाने सांगितले.