अबब..! सोनं, चांदी, हिरे, माणिक…; तब्बल 46 वर्षानंतर जगन्नाथ मंदिराचं रत्न भांडार उघडलं, 6 संदुकात भरणार खजिना

ओडिशातील पुरी येथील प्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार (खजिना) तब्बल 46 वर्षानंतर उघडण्यात आले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा खजिना उघडण्यात आला असून ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयानेही याला दुजोरा दिला आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या खजिन्यात सोनं, चांदी, हिरे, माणिक यासह असंख्य पुरातन दागदागिने असून याची मोजदाद आणि डिजिटल लिस्टिंग करण्यासाठी हा खजिना उघडण्यात आला आहे.

भांडार गृहामध्ये ओडिशा सरकारचे प्रतिनिधी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, श्री गणपती महाराजच्या प्रतिनिधींसह एकूण 11 लोकं उपस्थित आहेत. या सर्वांच्या समक्ष भांडारातील सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, माणिक, रत्न आणि किंमती वस्तूंचे वजन, डिजिटल लिस्टिंग आणि त्याच्या निर्मितीचा काळ निश्चित केला जाणार आहे.

मोजदाद आणि डिजिटल लिस्टिंग केल्यानंतर हा सर्व खजिना लाकडी संदुकांमध्ये भरला जाईल. यासाठी भलेमोठे 6 संदुक नव्याने बनवून घेण्यात आले असून रविवारी सकाळीच ते जगन्नाथ मंदिरात पोहोचले. या संदुकांचे वजनही जास्त असून त्याला उचलण्यासाठी जवळपास सहा-सात लोकं लागत आहेत. याचा व्हिडीओ ‘एएनआय’ने आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.

ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथाचे मंदिर 12व्या शतकातील असून तब्बल 46 वर्षांनी या मंदिराचा खजिने उघडण्यात आला आहे. याआधी 1978 मध्ये रत्न भांडार शेवटचे उघडण्यात आले होते. तेव्हापासून रत्न भांडार बंद ठेवण्यात आलेले होते. मात्र ओडिशा उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर आता हे रत्न भांडार उघडण्यात आले आहेत.

या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने बनवलेल्या समितीचे अध्यक्ष जस्टीस बिश्वनाथ रथ यांनी सांगितले की, रत्न भांडार उघडण्याआधी त्याचे मालक देवी बिमला, देवी लक्ष्मी यांची मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर देखभारकर्ते भगवान लोकनाथ यांचीही मंजुरी घेण्यात आली. दुपारी 12 च्या सुमारास सर्व सदस्यांन पारंपारिक पोषाखात मंदिरात प्रवेश केला आणि आज्ञा विधी (रत्न भांडार उघडण्यासाठी देवाची परवानगी घेणे) पूर्ण केला. त्यानंतर रत्न भांडाराचा दरवाजा उघडण्यात आला. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रिकरणही करण्यात आले आले आहे.

रत्न भांडारातून फुत्कार सोडल्याचे आवाज येत असतात. त्यामुळे रत्न भांडार उघडण्याआधी सर्पमित्रालाही पाचारण करण्यात आले. हिंदू पुराणांमध्ये साप किंवा नाग पुरातन खजिन्याचे रक्षण करतो अशी अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे रत्न भांडार उघडण्याआधी मंदिर समितीने भुवनेश्व येथून सर्पमित्राला बोलावून घेतले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले असून मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.