आरक्षण जाहीर करा, अन्यथा 20 जुलैपासून आमरण उपोषण; मनोज जरांगे यांचा मिंधे सरकारला इशारा

तुमचे राजकारण तुमच्याकडेच ठेवा, मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा नाहीतर 20 जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी आज मिंधे सरकारला दिला. आता मी दमलोय, आता मराठा समाजाशी चर्चा करून थेट विषयालाच हात घालणार आहे, असेही जरांगे म्हणाले.

भुजबळांच्या नादी लागलात तर पक्ष बंद पडेल

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप झाला. आता दुसरा टप्पा नंतर जाहीर करू, असेही ते म्हणाले. मराठा समाजाने दिलेल्या 9 मागण्या मान्य करा, त्या गैबण्याच्या छगन भुजबळांच्या नादी लागू नका. त्याच्या नादी लागून तुमचा पक्ष बंद पडेल आणि सत्ताही जाईल, असा मिश्कील टोलाही जरांगे यांनी लगावला.

उद्या सोमवारी रिंगण सोहळय़ासाठी माऊलीच्या दर्शनाला सोलापूर-वाखरीला जाणार आहे. 16 जुलैला परत येणार आहे. 17 तारखेला माझ्या हस्ते श्रीक्षेत्र नारायण गडावर विठूरायाची पूजा ठेवली आहे. त्यामुळे 17 तारीख गेली. आता 18 आणि 19 तारीखच हातात आहे. आम्हाला राजकारणात जायचे नाही, आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचे आहे, असे जरांगे म्हणाले.

आमदारांनी मराठा समाजाला त्रास देऊ नये

विधान परिषदेच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या आमदारांची मते घेऊन विजयी झालेल्या आमदारांनी मराठा समाजाला त्रास देऊ नये, नसता त्या आमदारांबरोबरच त्यांना मतदान करणाऱया मराठा समाजाच्या आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते जाहीर करू

येत्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते 20 जुलैला जाहीर करू, असे जरांगे म्हणाले. सरकारला एक संधी द्यायची आहे म्हणून मी उपोषणाला बसतोय. सरकार सुधरले तर सुधरले नाहीतर 288 उमेदवारांचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

मराठा वादळापुढे बंदूकफंदूक चालणार नाही

शांतता रॅलीचा पहिला टप्पाच इतका मोठा झाला मग मुंबईत गेल्यावर काय होईल, असा सवाल यावेळी जरांगे यांनी उपस्थित केला. रॅलीला आलेल्या लोकांचे उदाहरण देत जरांगे यांनी शिंदे-फडणवीस यांनाही इशारा दिला. हे लोक मुंबईला येऊ शकतात, या मराठा वादळापुढे तुमची बंदूकफंदूक चालणार नाही, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.