मनमानी प्रवेश… महाविद्यालयांवर कारवाई करा, प्रवेश नियंत्रण समिती स्थापन करण्याची युवासेनेची विद्यापीठाकडे मागणी

मनमानीपणे देणगी घेऊन आणि आरक्षणाचे नियम पायदळी तुडवून प्रवेश प्रक्रिया राबविणाऱया महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेक विद्यार्थी आणि पालकांनी अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयाने राबविलेल्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रारी आल्या होत्या. या प्रवेशामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि युवासेना मुंबई समन्वयक किसन सावंत यांनी मुंबई विद्यापीठ प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव बळीराम गायकवाड यांना निवेदन देऊन महाविद्यालयांमध्ये प्रवेश नियंत्रण समिती लावण्याची मागणी केली.

यापूर्वी अशा समिती महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया नियमानुसार केली आहे की नाही याची तपासणी करीत होत्या. तपासणीत अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यात येत होता. अशी समिती दरवर्षी गठीत करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना न्याय मिळेल या उद्देशाने निवेदन देण्यात आले आहे. जर विद्यापीठाने पुढील दहा दिवसांत अशा समिती नेमल्या नाहीत तर राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला.