आरक्षण मिळाले नाही तर नाव घेऊन पाडणार; बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. खरा जातीयवाद छगन भुजबळांनी पेटवला आणि सरकार भुजबळांच्या माध्यमातून जातीय दंगली घडवून आणू इच्छित आहे. त्यांनी जसे त्यांची जात एक केली तसे मी माझ्या जातीला एक केले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर यावेळी विधानसभा निवडणुकीत कोणाला पाडायचे ते नाव जाहीर करणार. आता ते मुंबईच्या बाहेर असतील आणि आपण मुंबईत असू, असा इशारा बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

बीडमध्ये गुरुवारी मराठा समाजाच्या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शांतता रॅलीच्या समारोपानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळच समाजाला मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, मराठ्यांनो मी तुमचा शब्द मोडत नाही. तुम्ही माझा शब्द मोडू नका, जिल्ह्यात आणि राज्यात शांतता राखा, सरकारला मी सांगू इच्छितो मराठा आणि कुणबी एकच आहेत. मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या ही आमची मागणी आहे. मराठ्यांनो आता गाफील राहू नका, कितीही एसआयटी नेमू द्या मला घेरू द्या, त्रास देऊ द्या, मी आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार असा निर्धार व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले, सरकार डाव टाकतंय, कितीही डाव टाकू द्या, समोर तुम्हाला बघितलं की मला शंभर हत्तीचं बळ येतंय. सरकारने मला घेरायचा ठरवले आहे. ओबीसी नेते एक होवून मला अडचणीत आणू पाहत आहेत. सरकार सवडशास्त्र शोधत आहे. गिरीष महाजन हे मंत्री माणसाला फसवतात. ज्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू असते त्या ठिकाणी गिरीष महाजन यांना पाठवले जाते. महाजन गेले की, आंदोलन मोडते, त्यांना वाटतं मी फार हुशार आहे. मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे हे त्यांना आता कळाले.

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात टीका केली. ते म्हणाले, मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या ही मागणी मी केली की, धनंजय मुंडेंचे कान टाईट झाले. ते उदय सामंत काही बोललेच नाही. ओबीसी नेत्यांची आता पोटे दुखू लागली आहेत. शब्दांचा आता खेळ करू लागले आहेत. सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना मी सांगू इच्छितो मराठ्यांनी अजून किती बलिदान द्यायचे, किती मराठ्यांच्या घरात आत्महत्या होऊ द्यायच्या, मराठ्यांच्या वेदना आणि त्यांचे हाल सरकारला नाही समजायचे. एकदा कपाळाचे कुंकू पुसलेल्या आई-बहिणीला जाऊन विचारा, ज्या घरात कुणी कर्ता पुरूष राहिला नाही त्या घरातल्या लेकरांना जगवायचे कसे, त्या माय माऊलींचा उभा संसार कसा होरपळतोय, तो त्रास आम्ही भोगलाय. आम्ही बघितलाय. एकदा त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करा, तुम्ही मराठ्यांकडून केवळ खुर्च्या घेणार आहात आणि त्यांची चेष्टा करणार आहात का असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

मतदान करताना एकगठ्ठा मतदान करा
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, यापुढे मराठा समाजाने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका, आपल्या समाज बांधवांवर कुठे अन्याय झाला, छळ झाला तर त्याच्या पाठिशी उभे राहा आणि मतदान करताना गाफील राहू नका, एक गठ्ठा मतदान करा, मराठ्यांना त्रास देणार्‍यांना सोडायचं नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

छगन भुजबळांवर घणाघाती हल्ला
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर घणाघात टिका केली. छगन भुजबळ हे बुरसटलेल्या विचारांचे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळते की काय म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. ओबीसींच्या नेत्यांना एक करून माझ्या विरोधात ओबीसींचे आंदोलन घडवून आणत आहेत. मला घेरण्यासाठी डाव टाकत आहेत. मराठ्यांच्या मागण्या मान्य होवू नयेत यासाठी छगन भुजबळांची झोपही उडाली आहे. अशा छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस सत्तेत आश्रय का देत आहेत हे कळत नाही. जो मराठ्यांना त्रास देईल, मराठ्यांचा छळ करेल, मराठ्यांच्या विरोधात वागेल त्याला निवडणुकीत सोडायचं नाही असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.