तीन भावंडे खिडकीत खेळत होती, अचानक ग्रील तुटली अन्…; कांदिवलीत धक्कादायक घटना

खिडकीच्या ग्रीलमध्ये खेळत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका 9 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात ही घटना घडली. आशिया विश्वकर्मा असे मयत चिमुरडीचे नाव असून, ती इयत्ता दुसरीत शिकत होती. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, कांदिवलीतील एका अपार्टमेंटमध्ये आशिया आपल्या कुटुंबासोबत राहत होती. आशियाचे वडील मानसिंग हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी मानसिंग यांची तब्येत बरी नसल्याने ते घरी आराम करत होते. तर आशिया आणि तिचे दोन भाऊ तिघेजण खिडकीच्या ग्रीलमध्ये खेळत होते. घरातील अन्य सदस्य बाहेर गेले होते.

रात्री 8 च्या सुमारास मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने मानसिंग यांना झोपेतून जाग आली. त्यांनी खिडकीजवळ जाऊन पाहिले असता ग्रील तुटून दोन मुले लटकत होती. तर आशिया खिडकीतून खाली तळमजल्यावर पडली होती.

मानसिंग यांनी दोन्ही मुलांना वर काढले. त्यानंतर त्यांनी तळमजल्यावर धाव घेतली. तळमजल्यावर आशिया गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडली होती. इमारतीतील नागरिकांच्या मदतीने त्यांना तिला तात्काळ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले.

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आशियाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारांदरम्यान बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.