महापालिका आयुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक, रस्त्यात वृक्षारोपण; सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन

शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रस्त्यात वृक्षारोपण करीत आणि पालिका आयुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

सोलापूर शहरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ अशी स्थिती असून, दुरुस्ती आणि पाइपलाइन टाकण्याच्या नावाखाली रस्ते उखडून ठेवण्यात आले आहेत. याबाबत नागरिकांत प्रचंड संताप असून, शिवसेनेच्या वतीने महापालिकेचा निषेध करीत तीव्र आंदोलन करण्यात आले. निराळेवस्ती ते अरविंद धाम परिसरातील मुख्य रस्ते डांबरीकरण केल्यानंतर ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून खोदलेला रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. या खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असतानाही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांत प्रचंड रोष असून, शिवसेनेने रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण केले व पालिका आयुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करीत निषेध केला.

यावेळी शिवसेनेच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करीत पालिकेचा निषेध करण्यात आला. या परिसरातील महिला नागरिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, गोविंद कांबळे, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.