मिहीरला अटक करायला 60 तास का लावले? वरळीची घटना हिट अ‍ॅण्ड रन नव्हे, मर्डर केस -आदित्य ठाकरे

वरळीतील घटनेत गुन्हेगाराने नाखवा दाम्पत्याला कारने उडवल्यानंतर कावेरी यांना अक्षरशः वरळी डेरीपर्यंत फरफटत नेले. यानंतर त्यांना बाहेर काढून गाडी रिव्हर्स घेऊन त्यांच्या अंगावरून गाडी नेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद असताना आरोपीला पकडण्यासाठी तब्बल 60 तास का लागले, असा सवाल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. आरोपीने इतक्या निर्दयीपणे केलेल्या कृत्याकडे केवळ हिट अॅण्ड रन म्हणून न पाहता मर्डर केस म्हणून पाहिले जावे, अशी मागणीही त्यांनी केली.

वरळीतील हिट अॅण्ड रन प्रकरणावर विधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर हल्ला चढवला. आरोपी मिहीर शहाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. या दुर्घटनेत काहीही केले तरी महिलेच्या जिवाची नुकसानभरपाई होणार नाही. पण तरीही सरकारने या महिलेच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी काही तरी करावे, अशी मागणाही त्यांनी केली. या गंभीर प्रकाराबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री गप्प का, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनीही या विषयावरील चर्चेत भाग घेतला. मिहीर शहाला फरार करण्यात कोणाचा हात आहे का याचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

नामकरणांबाबत सरकारने सद्यस्थिती सांगावी

मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याच्या शासकीय ठरावावरील चर्चेत भाग घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवतात. काही वर्षांपूर्वी 2021 मध्ये याच सभागृहात छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता आणि नवी मुंबईत दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. या नावांबाबत केंद्राकडून स्टेटस रिपोर्ट घेऊन सभागृहाला माहिती द्यावी.