वरळीतील घटना हिट ऍण्ड रन नाही तर हत्याच! मुंबईकरांचा संताप

एखाद्या हिंदी चित्रपटातला खुनशी व्हिलन एखाद्या सामान्य माणसाला ठार मारण्यासाठी कट रचून त्याच्यावर गाडी चढवतो आणि एवढेच करून थांबत नाही तर पुनःपुन्हा त्याला मरेपर्यंत गाडीखाली चिरडतो. असाच घटनाक्रम वरळीतील हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याने अत्यंत निर्दयीपणे केलेल्या हत्या प्रकरणात पाहायला मिळतो.

आरोपी मिहीरने कावेरी नाखवा हिला फक्त गाडीखाली चिरडले नाही तर पुन्हा दोन ते अडीच किलोमीटर फरफटत नेले. यात त्यांच्या अंगावरील कपडय़ाबरोबच देहाच्याही चिंध्या झाल्या. तेवढय़ावरच न थांबता आरोपी निर्ढावलेल्या आणि सराईत गुन्हेगारासारखा घटनास्थळावरून पळून गेला, पसार झाला. त्यामुळे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना केवळ हिट अँड रनसारखी नसून ही हत्याच आहे, असा संताप कावेरी यांचे पती प्रदीप यांच्यासह सोशल मीडियातूनही व्यक्त होत आहे.

पुण्यातल्या पोर्शे अपघातप्रमाणेच मुंबई अपघातातला आरोपी मिहीर शहासुद्धा या अपघातापूर्वी बारमध्ये गेला होता. जवळपास 18 हजारांचे बिल दिल्यानंतर तो निघाला, गाडी बदलली आणि त्यानंतर कावेरी नाखवांचा जीव घेऊन एक पुटुंब उद्ध्वस्त केले. आरोपी थांबला असता तर ही महिला आपल्या पुटुंबासोबत आज सुखरूप असती. पण मिहीरने फरफटत नेऊन तिचा जीव घेतला. मग हा अपघात कसा, ही तर हत्या आहे, असा संताप सोशल मीडियातून व्यक्त केला जात आहे.

पोलीस लपवाछपवी का करत आहेत?

बायको गमावणारे प्रदीप स्वत: सांगत आहेत की, गाडी मिहीर शहाच चालवत होता तर त्यानुसार पोलीस कारवाई का करत नाही, पोलिसांनी त्यावेळी गाड़ीत असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले. पण ड्रायव्हरने गाडी कोण चालवत होते, याबाबत काय जबाब दिला याबद्दल पोलीस का सांगत नाहीय, पुणे पॉर्शे प्रकरणासारखे इथेसुद्धा प्रकरण ड्रायव्हरवर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय? बारमधून आरोपी मिहीर शाह बाहेर पडताना आणि ड्रायव्हर ड्रायव्हिंग सीटवर बसतानाचे फुटेज पोलिसांनी कसे बाहेर येऊ दिले. ते आरोपीच्या सोयीसाठी का? ज्या भागात अपघात झाला तिथले सीसीटीव्ही फुटेज जर बाहेर आलं तर त्यात स्पष्टपणे कळेल की गाडी कोण चालवत होते. म्हणून हे फुटेज बाहेर येऊ दिले जात नाहीये का?

गाडीने फरफटत नेतानाच्या मार्गावर अनेक सीसीटीव्ही आहेत. मग पोलिसांना याची शहानिशा करण्यासाठी इतका वेळ का लागत आहेत? पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली, गाडी मिळाली. मग आरोपी मिहीर शहा नेमका कसा फरार झाला? यावेळी जर गाडी ड्रायव्हर चालवत होता तर ड्रायव्हर फरार झाला असता. पण इथे नेमके उलटे झाले आहे. ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि मिहीर गाडी चालवतच नसेल तर तो का फरार झाला, असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

पुण्यात हिट ऍण्ड रनमध्ये दोन पोलिसांचा बळी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हिट अॅण्ड रनचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी रात्री बोपोडी आणि पिंपळे सौदागर येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पोलिसांचा बळी गेला. पिंपळे सौदागर येथील घटनेतील भरधाव कारचालक अद्याप पसारच आहे, तर बोपोडी येथील अपघातातील कारचालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. समाधान कोळी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर पिंपळे सौदागर येथील घटनेत सचिन माने यांचा मृत्यू झाला.

…तरीही त्याने गाडी अंगावर चढवली!

कारच्या बोनेटवर पडल्यावर थांब थांब ओरडलो. त्याने ब्रेक मारला. मी डाव्या बाजूला आणि बायको गाडीसमोर पडली. तिला खेचणार तेवढय़ात त्याने गाडी बायकोच्या अंगावर चढवली. सीजे हाऊस ते सी-लिंकपर्यंत तिला फरफटत नेले. काय तिची अवस्था झाली असेल सांगा…तिच्या अंगावर कपडेही राहिले नाहीत. दोन मुलांना टाकून माझी बायको गेली. आम्ही मासे विकून घर चालवायचो. आता आमचं कमावणारं कोणी नाही. माझं घर उद्ध्वस्त झालं आहे. आम्हाला आधार द्यायला कोण आहे? आरोपीची काहीजण बाजू घेताहेत. राजकारण करताहेत. त्यांच्या घरचा माणूस गेला असता तर त्यांना कळलं असतं, असा संताप प्रदीप नाखवा यांनी व्यक्त केला.