आभाळमारा! पावसाचे तुफान, समुद्राला उधाण! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला धोका

mumbai rain

मुंबईसह कोकणावर गेल्या 24 तासांपासून पावसाचा तुफान आभाळमारा सुरू आहे. कोकणातील नद्यांना पूर आला असून अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. आतापर्यंत शेकडो रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले असून वाडीवस्त्यांमधून होडय़ा चालवण्याची आफत ओढवली आहे. रस्ते तुटल्याने, पाण्याखाली गेल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक भागांचा संपर्प तुटला आहे. कालपासून वीजही गायब आहे. कुडाळ तालुक्यात अत्यंत भीषण स्थिती असून पुराचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर शिरल्याने 14 तास वाहतूक ठप्प होती. या भागात एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, समुद्राला उधाण आले असून पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अॅलर्ट तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिह्यांत काही भागात अतिमुसळधार पावसाचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

24 तास राहा सतर्क…

मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला आहे. त्याच वेळी पावसाचा जोरही वाढत असल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संपूर्ण कोकणासाठी पुढचे 24 तास धोक्याचे असणार आहेत. किनाऱयांवर पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. किनाऱयाकडे येणाऱया पर्यटकांना माघारी धाडले जात आहे. त्याच वेळी लाऊडस्पीकरवरून धोक्याची सूचना देण्यात येत आहे. मच्छीमारांनाही सतर्प केले गेले आहे.

रेकॉर्डब्रेक पाऊस

रत्नागिरी जिह्यात गेल्या 24 तासांत 205 मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे जिह्यातील अनेक भागांत पूरस्थिती आहे. सिंधुदुर्गातही भीषण स्थिती आहे. एकटय़ा सावंतवाडी तालुक्यात 24 तासांत तब्बल 270 मिमी पाऊस झाला. देवगडमध्ये 261 मिमी, मालवणमध्ये 220 मिमी तर पुडाळमध्ये 215 मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे नद्यांना पूर येऊन पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे.

अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन उद्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लोक अडकले, एनडीआरएफची टीम दाखल

कुडाळ भंगसाळ (कर्ली), पावशी बेलनदी, वेताळबांबर्डे हातेरी, हुमरमळा पीठढवळ व माणगाव निर्मला नदी या नद्यांना पूर आला आहे.

कुडाळ कविलकाटे, काळपनाका, लक्ष्मीवाडी, पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर, अणाव, वाडी हुमरमळा, बाव, बांबुळी, सरंबळ, चेंदवण, पिंगुळी, बिबवणे, मांडपुली, मुळदे, आंबडपाल या नदीकाठच्या भागातील दीडशे घरांना पाण्याचा वेढा पडला.

घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या भागात प्रथम नागरिकांनीच बचावकार्य केले. सर्वांनाच रविवारची रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, ओरोस व पावशी येथे एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून पावशी शेलटेवाडी व अन्य भागातील नागरिकांना या पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.