सामना अग्रलेख – कट, कमिशन आणि मिंधे

महाराष्ट्रावर लाखो कोटींचे कर्ज चढले असताना मिंधे हे ठेकदारांच्या फायद्यासाठी चढय़ा भावाने ‘टेंडर’ काढत आहेत. समृद्धी महामार्गापासून ते कोस्टल रोडच्या कामापर्यंत फक्त कट-कमिशनच आहे. त्यामुळे मिंधे म्हणतात ते खरेच आहे. मोदी यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही असे मिंधे म्हणत असले तरी देशाच्या जनतेनेच मोदी यांचे बहुमत घालवून मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचा मेळा जमवत आहेत हे सिद्ध केले आहे. मोदी यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व लोक आज ‘टीम मोदी’मध्ये सुखाने नांदत आहेत. मिंधे व त्यांचे लोकही त्यात सामील आहेत. त्यामुळे मिंधे यांचा लाळघोटेपणा हा त्यांच्या मजबुरीतून आला आहे. कट, कमिशन, भ्रष्टाचार याच सूत्रामुळे दहा वर्षे मोदी-शहांनी राज्य केले व देशभरात अनेक मिंधे जन्मास घातले. मिंधे यांनी लाळघोटेपणा केला तरी मोदी यांचा भ्रष्टाचार लपून राहिलेला नाही. तो बाहेर आलाच आहे!

मुख्यमंत्री मिंधे यांचा लाळघोटेपणा टोकाला गेला आहे व त्या टोकावरून कडेलोट होण्याचा क्षण जवळ आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला. मोदी यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले असा मोघम आरोप काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी करताच मुख्यमंत्री मिंधे यांच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला. आपण भाजपचे पुढारी नसून नकली का होईना, पण शिवसेनेचे नाव लावून राजकीय दुकान चालवतो याचा त्यांना विसर पडला. काँग्रेसला पंतप्रधान मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही असे मिंधे यांचे सांगणे आहे व ते हास्यास्पद आहे. काँग्रेसने मोदीपुरस्पृत गैरव्यवहारांवर बोलू नये असा एखादा वटहुकूम जारी केला आहे काय? मोदी यांनी भ्रष्टाचाऱ्यांचा मेळा जमा केला आहे व त्याच मेळय़ात मोदी यांना मानसन्मान आहे. मिंधेसुद्धा त्याच मेळय़ातले मानकरी आहेत. मिंधे यांच्या स्मरणशक्तीचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. मोदी यांचा लाळघोटेपणा करताना मिंधे सांगतात, ‘10 वर्षांत पंतप्रधान मोदींवर एकही घोटाळय़ाचा आरोप झाला नाही. काँग्रेस नेत्यांनी खूप प्रयत्न केले, पण मोदींवर घोटाळा केल्याचा आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.’ मिंधे यांचे हे विधान गमतीचे आहे. महाराष्ट्रात मिंधे यांच्या नेतृत्वाखाली एक घटनाबाहय़ सरकार मोदीकृपेने चालवले जात आहे हाच एक मोठा घोटाळा आहे. शेकडो कोटींचा व्यवहार आमदार, खासदारांना विकत घेण्यासाठी झाला.

ईडी आणि सीबीआयच्या खांद्यावर

बंदूक ठेवून आमदारांना धाक दाखवण्यात आला. भारतीय घटनेची पायमल्ली करून मिंधे यांचे सरकार चालवले जात आहे हा घोटाळा नाही, तर काय आहे? देशाच्या संरक्षण क्षेत्रातील सगळय़ात मोठा राफेल घोटाळा मोदी यांच्याच काळात झाला. फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानामागे मोदी यांच्या मित्रांची ‘कट व कमिशन’ योजना आहे आणि या व्यवहाराचे लाभार्थी कोण हे मिंधे यांना माहीत असायला हवे. कट, कमिशन आणि भ्रष्टाचार हाच मोदी यांचा मंत्र आहे. निवडणूक रोखे घोटाळय़ात मोदी यांनी भाजपच्या तिजोरीत भ्रष्टाचाराचे कट व कमिशन आणले आहे. अनेक कंपन्यांना कामे दिली व कमिशन घेतले किंवा कामाच्या बदल्यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कमिशन घेतले. ईडी, सीबीआयच्या कारवाया करू व तुरुंगात टाकू, अशा धमक्या देऊन मोदी व त्यांच्या पक्षाने शेकडो कोटींचा निधी उकळला यास सोमनाथ, काशी मंदिरातून मिळालेले दान समजायचे काय? कट, कमिशन, भ्रष्टाचार व दहशतवाद याच सूत्रातून सध्याचा भाजप सुजला आहे. देशाला सगळय़ात जास्त रोजगार देणाऱ्या पब्लिक सेक्टरची विक्री मोदी यांच्या मित्रांना झाली. अत्यंत स्वस्तात हा व्यवहार झाला व हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. सार्वजनिक उपक्रमांच्या विक्रीतून मोदीपृत भाजपास कट, कमिशन मिळाले नाही असा मिंधे यांचा दावा आहे काय? मोदी-शहा यांचा

‘स्टॉक एक्स्चेंज’शी जुना संबंध

आहे व त्यांना हवे तेव्हा ते कृत्रिमरीत्या शेअर बाजार उचलत असतात. निवडणुकीपूर्वी खोटे एक्झिट पोलचे आकडे दाखवून ‘चारशे पार’वर जोर देऊन मोदी वगैरे लोकांनी शेअर बाजारात कृत्रिम फुगवटा आणला व आपल्या दिवाळखोर मित्रांना लाखो-कोटींचा फायदा करून दिला. पंतप्रधान शेअर बाजारात इतका रस घेतात तो ‘कट-कमिशन’मध्ये रस असल्याशिवाय? मोदी यांनी महाराष्ट्रासारख्या राज्याची तर लूटच केली व त्याच लुटीतून मिंधे यांनाही कट-कमिशन मिळत गेले. महाराष्ट्रावर लाखो कोटींचे कर्ज चढले असताना मिंधे हे ठेकदारांच्या फायद्यासाठी चढय़ा भावाने ‘टेंडर’ काढत आहेत. समृद्धी महामार्गापासून ते कोस्टल रोडच्या कामापर्यंत फक्त कट-कमिशनच आहे. त्यामुळे मिंधे म्हणतात ते खरेच आहे. मोदी यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही असे मिंधे म्हणत असले तरी देशाच्या जनतेनेच मोदी यांचे बहुमत घालवून मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचा मेळा जमवत आहेत हे सिद्ध केले आहे. मोदी यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व लोक आज ‘टीम मोदी’मध्ये सुखाने नांदत आहेत. मिंधे व त्यांचे लोकही त्यात सामील आहेत. त्यामुळे मिंधे यांचा लाळघोटेपणा हा त्यांच्या मजबुरीतून आला आहे. कट, कमिशन, भ्रष्टाचार याच सूत्रामुळे दहा वर्षे मोदी-शहांनी राज्य केले व देशभरात अनेक मिंधे जन्मास घातले. मिंधे यांनी लाळघोटेपणा केला तरी मोदी यांचा भ्रष्टाचार लपून राहिलेला नाही. तो बाहेर आलाच आहे!