मणिपूरमध्ये जे घडतंय तसं हिंदुस्थानात कुठेही पाहिलेलं नाही, इथं शांतता प्रस्तापित करण्याची गरज! राहुल गांधी

देशाचा अविभाज्य भाग असलेले मणिपूर गेल्या वर्षभरापासून अजूनही धगधगतेच आहे. मात्र सरकार त्याकडे कानाडोळा करत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी मणिपूरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी इंफाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसाचार झाल्यापासून मी तिसऱ्यांदा आलो आहे. हिंसाचाराने जनता उद्ध्वस्त झाली आहे. मणिपूरमध्ये जे घडतंय तसं हिंदुस्थानात कुठेही पाहिलेलं नाही. इथं शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, हिंसाचाराने जनतेला उद्ध्वस्त केलं आहे. मणिपूरमध्ये जे घडतंय तसं हिंदुस्थानात कुठेही पाहिलेलं नाही. मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, मी तुमचा भाऊ आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मी राज्यपालांशी बोललो आहे. मी मणिपूरवरून राजकारण करणार नाही. मणिपूरमधील लोकांच्या वेदनेची जाणीव आहे. राज्यातील जनतेला जेव्हा काँग्रेसच्या मदतीची गरज असेल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी मणिपूरच्या जनतेला दिले.

राहुल गांधी म्हणाले की, द्वेष आणि हिंसाचाराने काहीही होणार नाही. प्रेम आणि बंधुभावाने गोष्टी सोडवता येतील. आम्ही राज्यपालांना सांगितलं की, आम्ही जमेल तशी मदत करू. पुढे म्हणाले की, ‘मला पंतप्रधान मोदींना सांगायचं आहे की, मणिपूर हे आपलं राज्य असून याआधी तुम्ही इथे यायला हवं होतं. देशाच्या पंतप्रधानांनी इथं येऊन जनतेचा आवाज ऐकावा, अशी मणिपूरच्या जनतेची इच्छा आहे. मणिपूरच्या लोकांना याचा मोठा फायदा होईल असंही ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी राज्यातील अनेक ठिकाणी मदत शिबिरांना भेटी दिल्या. तेथे राहणाऱ्या जातीय हिंसाचारातील पीडितांशी संवाद साधला.