शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातील याचिकांवर होणार पुढील आठवड्यात सुनावणी; विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुद्दा निकालात निघणार?

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष फोडून चोरण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे पक्ष फोडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांच्या गटाला दिले आहे. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी आवाज उठवला असून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात आपल्या X हँडलवरील पोस्टमधून माहिती दिली आहे. आव्हाडांनी माहिती दिली आहे की त्यांच्या पक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. त्यावर सरन्यायाधिशांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यावरून पुढल्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार हे स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या याचिकेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची याचिका, शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत याचिका, राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आमदार अपात्रतेबाबत दाखल असलेल्या याचिकांची देखील सुनावणी होणार आहे.

12 जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत याचीकेवर सुनावणी, 15 जुलैला शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी, 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी, 19 जुलैला राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आमदार अपात्रतेबाबत होणार सुनावणी होणार आहे.

आपल्या X हँडलवर आव्हाड लिहितात की,’महाराष्ट्रातील फाटाफुटीनंतर अपात्रतेची लढाई सुरूच आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील आमची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. आज आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. हे म्हणणे ऐकल्यानंतर, ‘२३ तारखेला याबाबत सुनावणी लावून घ्यावे; मी स्वतः हे मॅटर ऐकणार आहे’. म्हणजेच महाराष्ट्रातील गद्दारी लोकांसमोर आली पाहिजे अन् त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, यासाठी आमचा हा लढा सुरू आहे. कारण, महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा हा भाग असून आपले संस्कार आणि संस्कृती वाचविली पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या X हँडलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

चार नंबर कोर्टामध्ये न्यायाधीश सूर्यकांतजींसमोर 16 व्या क्रमांकावर नागालँडच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी लागली होती. या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून दोन मिनिटात नोटीस काढण्याचे आदेश दिले, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. याच प्रकरणात त्यांना महाराष्ट्रासंबधात सांगितल्यानंतर त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. आम्ही त्यांना सांगितले की, 3 एप्रिलपर्यंत अजित पवार गटाला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश आपण दिले होते. मात्र, अजित पवार गटाने आजपर्यंत आपले म्हणणे मांडलेले नाही. ही बाब ऐकल्यानंतर, ” हे प्रकरणही 16 तारखेच्या कामकाजात घ्या; हे मॅटरही मी ऐकणार आहे’. आता आनंदाची गोष्ट ही आहे की, तिन्ही याचिकेंसंदर्भात, नागालँड एक आणि महाराष्ट्रातील दोन या याचिका न्यायालयासमोर आहेत. त्याच्या तारखा लागलेल्या आहेत. त्यामुळेच आता आम्हाला अपेक्षा आहे की, येत्या एक दीड महिन्यात या सर्व याचिकांवरील सुनावणी संपलेली असेल अन् महाराष्ट्राला न्याय मिळेल. या याचिकेंसंदर्भात आदरणीय शरद पवार साहेब अत्यंत गंभीर असून त्यांनी सर्वांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करून या याचिका अत्यंत ताकदीने लढण्याचे निर्देश दिले आहेत’, अशी माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.