जर तुमच्याबाबत असं कुणी बोललं तर किती वाईट वाटेल? अनिल परबांनी दाखवून दिली उपसभापतींची चूक

राज्यात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच सभागृहाचे कामकाज वादळी राहिले आहे. विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. सरकारी पक्ष त्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. तर विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधकांमधील चर्चा देखील गाजत आहे. विरोधक जराही हार मानायला तयार नसून उपसभापती विरोधकांना बोलून देत नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. सोमवारी विधानपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सभागृहात केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात अनिल परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची विनंतीही त्यांनी केली.

अनिल परब म्हणाले की, उपसभापती यांनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटल होतं की, तुम्ही सभागृहात गोंधळ घालता, कारण तुम्हाला उद्धव ठाकरे यांना तुम्ही काय काम करता हे दाखवायचं असतं. आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही, पण तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तुम्ही किती काम करताय हे दाखवायचं असतं म्हणून आम्हाला बोलू देत नाही. असं मी बोलणार नाही, पण आपल्या बाबतीत कुणी असंल बोललं तर तुम्हाला किती वाईट वाटेल?’ असा सवाल अनिल परब यांनी विचारून गोऱ्हे यांना चांगलंच अडचणीत आणलं. ‘मी काय काम करतो हे माझ्या पक्षप्रमुखांना माहित आहे. त्यामुळेच मला चार वेळा त्यांनी आमदार केले आहे. आता हेच जर कुणी तुमच्याबाबत बोलले तर तुम्हाला किती वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही तात्काळ माझ्याबाबत जी कमेंट केली आहे, ती सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका’, अशा धारदार आणि अचूक शब्दात अनिल परब यांनी गोऱ्हे यांना घेरलं. ‘ह्या सभागृहात तावातावाने भांडण, ह्या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे. माझ्या अधिकारावर कोणी गदा आणू शकत नाही’, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे यांना एक पाऊल मागे यावं लागलं. त्यांनी सामोपचाराची भूमिका घेत, ‘मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेली असेन, तर मी असं काही बोलले आहे का हे तपासून काढून टाकते’, असं आश्वासन अनिल परब यांना दिलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांसह महाविकास आघाडीच्या आमदारांनी दमदार भाषण करत, विविध प्रश्नांवरून सरकारला अडचणीत आणलं आहे.

पावसामुळे विधानसभेचं कामकाज झालं स्थगित

मुंबईत रविवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं रस्ते, रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. बरेच आमदार आणि अधिकारी अधिवेशनासाठी विधिमंडळात पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब केलं आहे.