Worli Hit and Run : 24 तास उलटले तरी आरोपी मोकाट, विधान परिषदेत जाब विचारणार – सचिन अहिर

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच रविवारी पहाटे वरळीत हिट अॅण्ड रन प्रकरण घडले. या अपघातात वरळीत मिंधे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख आणि उपनेता राजेश शहा याच्या मुलाने एका महिलेला आपल्या महागड्या गाडीने चिरडले. अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह मात्र अद्याप फरार आहे. त्यावर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले वरळी हिट अॅण्ड रनची घटना घडून 24 तास उलटले तरी आरोपी पकडला जात नाही हे दुर्देवी आहे. एवढ्या यंत्रणा असूनही आरोपी का पकडला जात नाही याबाबत विधान परिषदेत जाब विचारू आणि शासनाला कारवाई करण्यास भाग पाडू असेही त्यांनी म्हंटले आहे.

सचिन अहिर म्हणाले की, ‘हिट अॅण्ड रनची घटना घडून आज दुसरा दिवस असताना आरोपी अद्याप पकडला न जाणे हे दुर्देवी आहे. आमची नाही पण रविवारी प्रदीप नाखवा जे त्या घरातील कुटुंबाचे प्रमुख असून त्या महिलेचे पती आहेत त्यांच्या मनात देखील आपल्याला न्याय मिळेल की नाही अशी भावना झालेली आहे. अशाप्रकारे मोठमोठी लोकं येतील आणि गाडीने उडवून जातील आणि आपण काहीच करणार नाही. शासनाने जरी आदेश सूचना दिल्या असतील तरी देखील एवढ्या यंत्रणा आहेत, मोबाईल लोकेशन ट्रॅक करता येतात, क्राईमला अॅक्टीवेट करूनही आरोपी का पकडला जात नाही. याचा जाब आम्ही निश्चितपणे परिषदेमध्ये विचारू आणि शासनाला कारवाई करण्यास भाग पाडू असे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ही कारवाई करत असताना पण कायदा सुव्यवस्था नियमांच्या बाबतीत देखील काही गोष्टी पाहायला हव्या. विशेष म्हणजे फरार होण्याचे कारण असेल, त्यांचे नमुने घ्यायला त्यांना वेळ मिळेल. नमुने मिळाल्यानंतर ते नशेमध्ये होते की नव्हते या सर्व गोष्टी त्यात येणार नाहीत. त्यामुळे याबाबतीतही काही कडक कायदे करणे गरजेचे आहे. अशा प्रवृत्तीला म्हणजे अपघात झाला असता ते थांबले असते रुग्णालयात नेले असते तर कदाचित त्या महिलेचा जीव वाचला असता. पण त्याची दखल न घेता महिलेला फरफटत नेले. हा हत्येचा कट आहे. हे जाणूनबुजून केलेले आहे त्यामुळे याबाबतीत पोलीस कोणते कलम लावत आहेत याकडे आम्ही लक्ष ठेवले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वत: पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणत्याही प्रकारे कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई व्हायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहेत’.

सचिन अहिर म्हणाले की, ‘आम्ही या प्रकरणात राजकारण करू इच्छित नाही. परंतु आम्ही कुटुंबीयांशी जेव्हा बोललो त्यावेळी आरोपींनी गाडीचे नंबर प्लेट बदलले, गाडीवरील पक्षाचे चिन्ह खोडण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली आहे. म्हणजे याचा अर्थ असा हे कुठेतरी लपविण्याचा प्रयत्न केला. अर्थात माध्यमांनी या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. मुख्यमंत्री यांनीही आदेश दिले आहेत पक्ष बघता कामा नये. आम्ही आता बघतोय आजच्या दिवशी काय होणार आहे. नाहीतर विधान परिषदेमध्ये हा विषय घेऊन सरकारला जाब विचारू’.