एल्ड्रिन, अंकिताला ऑलिम्पिकचे तिकीट

लांब उडीमध्ये जेस्विन एल्ड्रिन व पाच हजार मीटर शर्यतीतील अंकिता ध्यानी या हिंदुस्थानी खेळाडूंना रविवारी पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. या दोघांनाही जागतिक क्रमवारीच्या कोटय़ातून ऑलिम्पिकची पात्रता मिळाली आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानी खेळाडूंची संख्या 30 झाली असून 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या महापुंभास प्रारंभ होणार आहे.

राष्ट्रीय विक्रमवीर जेस्विन एल्ड्रिन व अंकिता ध्यानी या दोघांचीही नावे जागतिक अॅथलेटिक्स (डब्ल्यूए) यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. ऑलिम्पिकची पात्रता मिळविल्यानंतरही काही खेळाडूंनी वेगवेगळय़ा कारणांमुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याने या हिंदुस्थानच्या दोन खेळाडूंना पॅरिस वारीची संधी मिळाली. लांब उडीतील हिंदुस्थानी खेळाडू मुरली श्रीशंकरने ऑलिम्पिकचे तिकिट मिळविले होते, मात्र दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. लांब उडीत 32 व्या मानांकनापर्यंतचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असून एल्ड्रिन 31 व्या स्थानी आहे. पाच हजार मीटर शर्यतीत 42 क्रमांकापर्यंतचे धावपटू सहभागी होणार असून अंकिता नेमकी 42 व्या स्थानी आहे.