टीम इंडियाचा शंभर नंबरी विजय; दुसऱया टी-20 मध्ये झिम्बाब्वेची दाणादाण, अभिषेक शर्माचे वादळी शतक

सलामीच्या लढतीतील पराभव जिव्हारी लागलेल्या टीम इंडियाने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात यजमानांचा शंभर धावांनी धुव्वा उडविला. अभिषेक शर्माचे वादळी शतक, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग यांची फटकेबाजी आणि अचूक टप्प्यावरील गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. शतकवीर अभिषेक शर्मा या विजयाचा शिल्पकार ठरला.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव 18.4 षटकांत 134 धावांवरच गारद झाल. यजमानांची 4 षटकांत 4 बाद 46 अशी दुर्दशा झाली. मग त्यांना पुन्हा सावरता आले नाही. मुकेश कुमारने तिसऱयाच चेंडूवर इनोसंट पैयाचा त्रिफळा उडवून हिंदुस्थानला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्यानंतर वेस्ली मधेवरे (43) व ब्रायन बेनेट (26) यांनी 36 धावांची भागीदारी करीत झिम्बाब्वेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुकेश कुमारने बेनेटचा त्रिफळा उडवून ही जोडी पह्डली. मग फिरकीपटू रवी बिष्णोईने चौथ्या षटकांत वेस्ली व क्लाईव्ह मदांडे (0) यांना बाद करून झिम्बाब्वेच्या आघाडीच्या फळीला भगदाड पाडले. त्यानंतर केवळ ल्यूग जोंगवेने हिंदुस्थानी गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार करत 33 धावांची खेळी केली. हिंदुस्थानकडून मुकेश कुमार व आवेश खान यांनी 3-3 फलंदाज बाद केले. याचबरोबर रवी बिश्नोईने 2 व वाशिंग्टन सुंदरने एक बळी टिपला.

ऋतुराजरिंकूची फटकेबाजी

अभिषेक शर्मा तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि आलेला रिंकू सिंग यांनीही झिम्बाब्वेची गोलंदाजी पह्डून काढली. या दोघांनी तिसऱया विकेटसाठी 36 चेंडूंत 87 धावांची अभेद्य भागीदारी करीत हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. ऋतुराजने 47 चेंडूंत नाबाद 77 धावा करताना 11 चौकारांसह एक षटकार ठोकला, तर रिंकूने 22 चेंडूंत नाबाद 48 धावा करताना 5 टोलेजंग षटकारासह 2 चेंडू सीमापार पाठविले.

विक्रमांचा अभिषेक

n अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत शतक ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने तीन डावांत शतक ठोकणाऱया दीपक हुड्डाला पिछाडीवर टाकले. के. एल. राहुलने चौथ्या डावात शतक ठोकले होते.

n झिम्बाब्वेविरुद्ध 8 षटकार ठोकणाऱया अभिषेक शर्माने एका वर्षात सर्वाधिक 47 षटकार ठोकण्याचा विक्रम केला. त्याने रोहित शर्माला (46 षटकार) याबाबतीत मागे टाकले.

n अभिषेक शर्मा-ऋतुराज गायकवाड या जोडीने दुसऱया विकेटसाठी केलेली 137 धावांची भागीदारी झिम्बाब्वेविरूद्धची हिंदुस्थानची सर्वोत्तम टी-20 भागीदारी ठरली.

n अभिषेक शर्मा हिंदुस्थानचा टी-20 क्रिकेटमधील संयुक्तपणे तिसरा वेगवान शतकवीर ठरला. अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्माने 35 चेंडूंत, तर दुसऱया स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने 45 चेंडूंत शतक ठोकले होते. अभिषेकच्या आधी के. एल. राहुलनेही 46 चेंडूंत शतक झळकाविलेले आहे.

हरारेत शर्माचे शतकी वादळ

त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 2 बाद 234 धावांचा डोंगर उभारला. सलामीच्या लढतीत एकाकी किल्ला लढविणारा कर्णधार शुबमन गिल (2) दुसऱयाच षटकात बाद झाला. ब्लेसिंक मुझरबानीने त्यायला बेनेटकरवी झेलबाद करून झिम्बाब्वेला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला अभिषेक शर्मा (100) व गिलच्या जागेवर आलेला ऋतुराज गायकवाड (नाबाद 77) यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर हवाई हल्ले चढवित दुसऱया विकेटसाठी 76 चेंडूंत 137 धावांची वेगवान भागीदारी केली. अभिषेक शर्माने 47 चेंडूंत 8 षटकार व 7 चौकारांचा घणाघात करीत आपली 100 धावांची वादळी खेळी सजविली. वेलिंग्टन मसाकाद्झाला लागोपाठ तीन षटकार ठोकून शर्माने शतकी अभिषेक घातला अन् चौथा चेंडूही मैदानाबाहेर भिरविण्याच्या नादात मेयर्सकडे झेल दिला अन् झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सुटकेचा निःश्वास सोडला.