रायगडावर ढगफुटी, पायर्‍यांवरुन पाणी वाहू लागल्याने शेकडो पर्यटक अडकले; प्रशासनाने केली सुटका

रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. किल्ले रायगडवर, तर अक्षरश: ढगफुटी व्हावी असा पाऊस कोसळला. त्यामुळे शिवभक्त आणि पर्यटक गडावर अडकून पडले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाच्या मदतीने त्यांना सुखरूप गडाखाली आणण्यात आले.

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. किल्ले रायगडावर ढगफुटी व्हावी असा पाऊस कोसळल्यामुळे गडावर आलेल्या शिवभक्त आणि पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. गडाच्या पायऱ्यांना अक्षरश: ओढ्याचे रूप प्राप्त झाले होते. पावसाचा जोर इतका होता की, पायऱ्यांवर कंबरभर वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत होता. या प्रवाहामध्ये काही पर्यटक अडकून पडले होते. एकमेकांना आधार देत सर्वजण सुखरूप गडाखाली आले. काही पर्यटकांनी या भयंकर प्रवाहाचा आणि त्यात अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडीओ काढून व्हायरल केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला याची माहिती झाली. त्यानंतर त्यांनी धावपळ करून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर सर्व पर्यटकांना सुखरूप गडाखाली उतरवले. सुदैवाने या प्रवाहात कोणीही वाहून गेले नाही.