Chandrapur News : चंद्रपूरमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना, बल्लापूरमध्ये कापड दुकानात हल्ला

चंद्रपूर शहरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता बल्लारपूर शहरात पुन्हा तशीच घटना उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील गांधी चौकातील एका कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकल्याची घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. घटनेनंतर आरोपी पसार झाले.

गांधी चौक परिसरात मालू कापड दुकान आहे. दुचाकीवरून तीन जण या दुकानाजळ आले. त्यानंतर त्यांनी दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकला. त्यानंतर दोघे जण दुकानात घुसले. या हल्ल्यात दुकानातील एक कामगार जखमी झाला. अन्य कामगार सुदैवाने सुखरूप आहेत.

कार्तिक साखरकर असे जखमी कामगाराचे नाव आहे. दुकानाचे मालक सुरेश मालू आणि सुनील मालू यांच्यावर हा हल्ला केल्याचा आरोपींचा कट असल्याचे समजते. आरोपी पळून गेले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वर्षभरापूर्वी याच दुकानाला आग लागली होती. आगीत दुकान जळून खाक झाले होते. याप्रकरणातील संशयित आरोपी सूरज गुप्ता गेल्या वर्षभरापासून फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेनेच्या जिल्हाधिकाऱ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात मनसे कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार जखमी झाला होता. या घटनेला तीन दिवस उलटत नाहीत तोच दुसरी घटना घडली.