Euro Cup 2024 – फ्रान्स उपांत्य फेरीत; पोर्तुगाल शूट‘आऊट’, रोनाल्डोचे किताबासह निरोपाचे स्वप्न भंगले

फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणलेल्या चुरशीच्या लढतीत पोर्तुगालचा 5-3 गोल फरकाने पराभव करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची या उपांत्यपूर्व लढती जादू चालली नाही. विक्रमी सहा वेळा युरो चषक स्पर्धेत खेळलेल्या 39 वर्षीय रोनाल्डोचे किताबासह या स्पर्धेला निरोप देण्याचे स्वप्न अखेर भंगले. कारण पोर्तुगालच्या या दिग्गज खेळाडूने ही आपली अखेरची युरो चषक स्पर्धा असेल, असे आधीच जाहीर केले होते.

पोर्तुगाल-फ्रान्स दरम्याच्या लढतीमध्ये रोनाल्डो आणि काइलियन एम्बाप्पे या स्टार खेळाडूंमधील द्वंद्वाकडे अवघ्या फुटबॉलप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या, मात्र यात फ्रान्सच्या खेळाडूची आपल्या आयडॉलवर सरशी झाली. उभय संघांतील खेळाडूंनी या बाद फेरीच्या लढतीत एकमेकांना कडवी टक्कर दिली. त्यामुळे निर्धारित वेळेसह अतिरिक्त वेळेनंतरही गोलशुन्य बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही. त्यामुळे या लढतीचा निकाल पेनल्टी शूटआऊटने लागला.

पोर्तुगालच्या जोआओ फेलिक्सची पेनल्टी किक गोल पोस्टच्या खांबाला लागली अन् या संघाच्या पाठीराख्यांमध्ये सन्नाटा पसरला. त्यानंतर थियो हर्नांडेजने निर्णायक पेनल्टी गोल करीत फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचविले.

फ्रान्सला 2021च्या युरो चषकात अंतिम 16च्या लढतीत, तर 2022 च्या फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये हार पत्करावी लागली होती, मात्र यावेळी त्यांना नशिबाचीही साथ मिळाली. आता उपांत्य लढतीत फ्रान्सपुढे स्पेनचे कडवे आव्हान असेल.

 स्पेनने यजमान जर्मनीला केले बाहेर

पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत स्पेनने यजमान जर्मनीचा 2-1 गोल फरकाने पराभव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. डॅनी ओल्मोने 51 व्या मिनिटाला गोल करीत स्पेनचे खाते उघडले. मग फ्लोरियन विर्ट्झने 89 व्या मिनिटाला गोल करीत जर्मनीला 1-1 अशी बरोबरी साधून दिल्याने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ही लढत आता शूटआऊटमध्ये जाणार असे वाटत असताना अतिरिक्त वेळेत अखेरच्या क्षणी म्हणजे 119 व्या मिनिटाला मायकल मेरिनोने डॅनी ओल्मोच्या पासवर भन्नाट गोल करीत स्पेनला उपांत्य फेरीत पोहोचवले.