Yavatmal News : शिक्षिकेचा विनयभंग, खाकी वर्दीतल्या नराधमावर कारवाई; अ‍ॅट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल

>>प्रसाद नायगावकर

जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील शिक्षिकेला त्रास देणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. विनयभंगासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आरोपीवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

निलेश पेंढारकर असे शिक्षिकेला त्रास देणाऱ्या आरोपी पोलीस जामदाराचे नाव आहे. जिल्ह्यातील महागाव पोलीस ठाण्यात तो कार्यरत असून पुसद येथील वसंतनगर परिसरात वास्तव्याला आहे. खाकी वर्दीचा माज दाखवत आरोपी खासगी शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेला वारंवार त्रास देत होता. अश्लील संदेश पाठवणे, पाठलाग करणे आणि रस्ता आडवण्यासारखी कृत्य तो वारंवार करत होता. पीडितेला त्रास असह्य झाल्याने तिने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतू वसंतनगर पोलीसांनी हातावर हात ठेवण्यापलीकडे कोणतीच कारवाई केली नाही.

रक्षकच भक्षक झाल्याने न्याय मागायचा कुणाकडे या विंवचनेत सापडलेल्या पीडितने अखेर “निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग” अमरावतीच्या विभागीय अध्यक्षा प्राचार्य डॉ.मिनाक्षी सावळकर यांची भेट घेतली. त्यांना सदर प्रकराबद्दल सर्व माहिती सांगीतली. त्यानंतर डॉ.सावळकर यांनी पीडितेला सोबत घेत 5 जुलै रोजी जिल्हा अधीक्षक डॉ.पवन बनसोडे यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर झोपलेले पोलीस जागे झाले व जिल्हा अधीक्षकांच्या आदेशानंतर वसंतनगर पोलीसांनी आरोपी पोलीस जामदाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी निलेश पेंढारकर याच्याविरुद्ध भादंवि 354 (ड), 384, 323, 294, 141, 143 आणि अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोडे यांनी आरोपी पोलीस जामदार निलेश पेंढारकर याला निलंबित केले आहे.