विशेष – चॉकलेटचे खाणार त्याला…

>> उदय पिंगळे

जाहिरातदारांनी विविध समाज माध्यमांतून चॉकलेटची भेट देणं हे प्रेमाचं प्रतीक असल्याची संकल्पना रुजवली आणि चॉकलेट देण्यासाठी खाण्यासाठी कोणतंही कारण लागत नसल्याचं ठसवलं. सर्व वयोगटांतील लोकांनी हळूहळू चॉकलेटला वेगवेगळ्या चवीत आणि रूपात स्वीकारल्याने आता चॉकलेट हे आनंद, प्रेम आणि उत्सव यांचं प्रतीक बनलं आहे. 7 जुलै जागतिक चॉकलेट दिनानिमित्त विशेष लेख.

एक काळ असा होता की, कुणी पाहुणा आला तर तो खाऊ म्हणून बहुतेक ग्लुकोज बिस्कीटचा पुडा आणत असे, पण जसजशी थोडी आर्थिक सुबत्ता आली, बिस्कीटची जागा चॉकलेटने कधी घेतली ते समजलंच नाही. चॉकलेट पाहून तोंडाला पाणी सुटलं नाही असा माणूस विरळाच. जाहिरातदारांनी विविध समाज माध्यमांतून चॉकलेट देणं हे प्रेमाचं प्रतीक असल्याची संकल्पना चांगलीच रुजवली आणि त्याही पुढे जाऊन चॉकलेट देण्यासाठी कोणत्याही कारणांची जरुरी नसल्याचं ठसवलं. सर्व वयोगटांतील लोकांनी त्याचे वेगवेगळे स्वाद स्वीकारल्याने आता चॉकलेट हे आनंद, प्रेम आणि उत्सव यांचं प्रतीक बनलं आहे.

खरं तर चॉकलेटचा इतिहास 5300 वर्षांपूर्वीचा आहे. दक्षिण अमेरिकेतील लोकांनी जंगलातील कोकोच्या फळांपासून चॉकलेट बनवण्याची पद्धत शोधली होती. या झाडाच्या फळांच्या बियांपासून त्यांनीच पहिलं चॉकलेट बनवलं. सुरुवातीला अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये यावर प्रयोग झाले. त्यानंतर सन 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मेक्सिकोवर ताबा मिळवला. त्याला ‘कोको’ फार आवडलं आणि त्यानंतर राजाने कोकोच्या बिया मेक्सिकोतून स्पेनमध्ये आणल्या. तेव्हापासून तिथे चॉकलेट प्रचलित झालं, असं सांगितलं जातं. सुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. ही चव बदलण्यासाठी यामध्ये मध, व्हॅनिलासोबत इतरही पदार्थ एकत्रित करून त्यापासून कोल्ड कॉफी बनवण्यात आली. मग डॉक्टर सर हॅन्स स्लोन यांनी द्रव स्वरूपातल्या काल्ड काफीला चावून खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं. सन 1828 मध्ये डच केमिस्ट कॉनराड जोहान्स वान हॉटन नावाच्या व्यक्तीने ‘कोको प्रेस’ नावाचं यंत्र बनवलं. या यंत्राद्वारे कोकोची चव बदलण्यात यश आलं. सन 1848 मध्ये जे. एर फ्राई अँड सन्स या ब्रिटिश चॉकलेट कंपनीने पहिल्यांदा कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर एकत्र करून त्याला घट्ट चॉकलेटंच स्वरूप दिलं. जरी कोकोचा जन्म अमेरिकेत झाला असला तरी आता विषुववृत्तीय प्रदेशात तसंच इतरत्रही कोको लागवड केली जाते. आफ्रिकेतील पश्चिम भागाकडील कोट डी आयव्होर, घाना हे एकविसाव्या शतकातील कोकोचे प्रमुख उत्पादक देश असून तेथे 60 टक्क्यांहून अधिक कोकोचे उत्पादन होते. अलीकडे येथील हवामानातील बदलाने कोको उत्पादन घेणं कष्टमय झालं आहे. आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस हा प्रेम सप्ताहाचा भाग असून जागतिक चॉकलेट दिवस हा चॉकलेटचं महत्त्व आणि अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी आता साजरा केला जातो.

जागतिक चॉकलेट दिवस अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. कारण

जगभरातील सर्वच लोकांच्या दृष्टीने चॉकलेट हा असा पदार्थ आहे, जो प्रेम आणि आदर यांची आठवण करून देतो. तसंच जगभरातून चॉकलेट निर्मिती व्यवसाय करणाऱ्या लोकांचा या दिवशी सन्मान केला जातो.

जगभरात याच दिवशी विविध स्वाद, आकारातील चॉकलेट पाहण्याची आणि त्याची चव घेण्याची संधी लोकांना मिळते. त्यामुळे दिवसभर लोक चॉकलेट पाहतात, त्याचा आस्वाद घेतात, भेट म्हणून देतात. याच दिवशी चॉकलेटचा वापर केलेल्या मिठाईचाही आस्वाद घेतला जातो.

चॉकलेटसंबंधातील काही ज्ञातअज्ञात गोष्टी

फार पूर्वी यास पवित्र भोजन मानले जात असे, त्याचप्रमाणे कोकोच्या बियांचा चलन म्हणून वापर केला जात असे.

स्वित्झर्लंड चॉकलेटसाठी प्रसिद्ध असून सर्वाधिक उत्पादन आणि विक्री तेथे होते. सन 1828 मध्ये सीजे व्हॅन
हॉऊटने चॉकलेट पावडर निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे पेटंट घेतले. चॉकलेटचा सर्वाधिक मोठा 5792.5 किलोचा बार सन 2010 मध्ये आर्मेनियामध्ये तयार केला होता.

सफेद चॉकलेट हे खरं चॉकलेट नसून ते कोको बटर, साखर आणि दूध यांपासून बनवलं जातं. यात महत्त्वाचा घटक म्हणून कोको नसतो.

अमेरिका खंडात व्हालेंटाईन दिनापूर्वीच्या आठवड्यात सर्वाधिक म्हणजे 58 मिलियन पाऊंड चॉकलेटची विक्री होते.

सन 1819 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये स्थापन झालेली कैइलर ही सर्वात जुनी चॉकलेट निर्मिती करणारी कंपनी असून ती अजूनही कार्यरत आहे.

चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठीसुद्धा उत्तम ठरतं. ‘डार्क चॉकलेट’ खाण्यामुळे हृदयाच्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. यामधील नैसर्गिक तत्त्वं आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतात. असं असलं तरी 30 ते 50 ग्रॅमहून अधिक चॉकलेट खाणं हितावह नाही. चॉकलेटची गणना आपल्याकडे जंक फूड म्हणूनच केली जाते. त्याचे सेवन करताना अतिरिक्त साखरही घेतली जाते, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

हिंदुस्थानात सर्वाधिक चॉकलेट विक्री कॅडबरी कंपनीची होते. तिचे डेअरी मिल्क, सिल्क, फाईव्हस्टार यांसारखे वेगवेगळे लोकप्रिय ब्रँड असून ते केवळ हिंदुस्थानातच नाही, जगभर प्रसिद्ध आहेत. त्याखालोखाल नेस्लेचे किटकॅट, डार्क फँटसी, तर अमूलचे फ्रूट अँड नट, ट्रॉपिकल ऑरेंज हे ब्रँड येतात. उटी हे हिंदुस्थानातील चॉकलेटच्या गृह उद्योगाचे केंद्र आहे. तेथील घराघरांत चॉकलेट तयार केले जाते. तामीळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांत कोकोचे सर्वाधिक उत्पादन होते. अमूल ही चॉकलेट निर्मिती क्षेत्रात असलेली सर्वात मोठी स्वदेशी कंपनी आहे.

कोका फ्रूट जेली हा चॉकलेटचे आरोग्यकारी गुणधर्म असणारा उपयुक्त टिकाऊ पदार्थ आहे.

हिंदुस्थानातील चॉकलेट उद्योगात दरसाल 8.8 टक्के वाढ होत आहे.

‘टो आक’ हे जगातील महागडे चॉकलेट असून त्याची किंमत प्रतिबार 32 हजार रुपये आहे.

7 जुलै 1550 रोजी युरोपियन लोकांना चॉकलेटची माहिती झाली असं मानण्यात येऊन जगभरात चॉकलेट उत्पादकांकडून सन 2009 पासून हा दिवस ‘जागतिक चॉकलेट दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. चॉकलेटची आवड असणाऱ्या सर्व चॉकलेटप्रेमींना आजच्या जागतिक चॉकलेट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

[email protected]

(लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)