ब्रिटनमध्ये 400 पार! अब की बार ‘मजूर’ सरकार; कीर स्टार्मर नवे पंतप्रधान, ऋषी सुनक पायउतार

ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्ष म्हणजेच हुजूर पक्ष तब्बल 14 वर्षांनंतर लेबर म्हणजेच मजूर पार्टीकडून पराभूत झाला. विरोधी बाकावरील मजूर पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल 400 हून अधिक जागांवर विजय प्राप्त करून सर्वांत मोठा पक्ष ठरला. जनतेने दिलेला कौल मान्य करून हुजूर पक्षाचे अध्यक्ष ऋषी सुनक यांनी पक्षाची माफी मागत नेतेपदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचे 61 वर्षीय कीर स्टार्मर देशाचे 58 वे पंतप्रधान बनणार आहेत. दरम्यान, सुनक यांनी स्टार्मर यांना फोन करून विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

निवडणुकीत मजूर पक्षाने एकूण 650 जागांपैकी 412 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. सरकार स्थापन करण्यासाठी 326 जागांची आवश्यकता आहे. हुजूर पक्षाला केवळ 120 जागांपर्यंत मजल मारता आली. हुजूर पक्षाचा गेल्या 200 वर्षांतील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. दरम्यान, कीर स्टार्मर हे मजूर पक्षाचे सातवे तर देशाचे 58 वे पंतप्रधान बनणार आहेत.

मजूर पक्षासमोर आव्हानांचा डोंगर

– सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवूनही मजूर पक्ष आणि स्टार्मर यांना म्हणावा तितका आनंद झालेला नसल्याचे ब्रिटनमधील राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या कठीण काळात मजूर पक्ष सत्तेवर येत आहे. त्यामुळे त्यांना हुजूर पक्षाच्या 14 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

– राचेल रिव्हस् या मजूर पक्षाच्या नेत्या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनणार आहेत. कीर स्टार्मर यांनी ब्रिटनच्या अर्थमंत्री म्हणून त्यांची निवड केली आहे.

मी पक्ष आणि कार्यकर्त्यांची माफी मागतो – सुनक

मला माफ करा, असे पक्षाला आणि कार्यकर्त्यांना मी सर्वप्रथम सांगू इच्छितो. मी माझ्या कामासाठी माझे सर्वस्व दिले. परंतु तुम्ही स्पष्ट संकेत दिले आहेत की, युनायटेड किंगडमचे सरकार बदलले पाहिजे आणि तुमचाच निर्णय महत्त्वाचा आहे. या नुकसानीची जबाबदारी मी घेतो. निकालानंतर मी पक्षाचे नेतेपद सोडत आहे, अशा शब्दांत ऋषी सुनक यांनी निकालानंतर पक्षाला आणि देशाला उद्देशून भावना व्यक्त केल्या. माझ्या हातात सत्ता आल्यानंतर मी आर्थिक सुधारणांवर भर दिला, देशाचा आर्थिक दृष्टिकोन पक्षासाठी महत्त्वाचा होता. मी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून उभा राहिलो, तेव्हा मी सांगितले होते की देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. महागाई पुन्हा वाढल्याची कबुलीही सुनक यांनी यावेळी दिली. दरम्यान, देश 20 महिन्यांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि मजबूत आहे. तसेच 2010 च्या तुलनेत अधिक समृद्ध, सुंदर आणि लवचिक आहे, असेही ते म्हणाले.

सुनक यांना हरवणारे स्टार्मर कोण आहेत?

2 सप्टेंबर 1962 साली लंडनमध्ये परिचारिकेच्या घरी स्टार्मर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रॉडनी स्टार्मर हे कट्टर डावे होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव लेबर पार्टीचे संस्थापक कीर हार्डी यांच्या नावावरून ठेवले. स्टार्मर यांचे बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ग्रामर स्कूलमध्ये प्रवेश घेतला. अभ्यास, खेळ आणि संगीतातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांचे भाऊ आणि बहिणी त्यांना शाळेचा सुपरबॉय म्हणायचे. वयाच्या 16 व्या वर्षी ते लेबर पार्टीच्या युवा विंग यंग सोशालिस्टमध्ये सामील झाले. 1987 मध्ये लंडनमध्ये त्यांनी मानवी हक्क आणि गुन्हेगारी संरक्षण कार्य यांसारख्या विषयांच्या माध्यमातून बॅरीस्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

कश्मीरबद्दलची भूमिका बदलली

कश्मीरच्या मुद्दय़ावरून जेरेमी कॉर्बिन यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाने कश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी लावून धरली होती. मात्र मजूर पक्षाची या वेळची भूमिका वेगळी आहे. हिंदुस्थान, ब्रिटनमधील संबंध सुधारावेत यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत. कश्मीरबद्दलची त्यांची भूमिका बदलली असून हिंदुस्थानसोबत नवे व्यापारी करार करण्याच्या दृष्टीने स्टार्मर प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या घोषणापत्रातही त्यांनी याबद्दलची भूमिका मांडली होती.

सुनक यांच्या मेहनतीला सलाम

=ऋषी सुनक भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ठरले. त्यांच्या मेहनतीला आमचा सलाम आहे, असे कीर स्टार्मर म्हणाले. आता रिसेट करण्याची वेळ आली आहे, मात्र परिस्थिती बदलायला वेळ लागेल. मी एक-एक वीट जोडून देशाला पुन्हा उभे करेन, असा विश्वास स्टार्मर यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थानी वंशाचे हे उमेदवार झाले खासदार

हुजूर पक्षाचे ऋषी सुनक, शिवानी राजा, सुएला ब्रेव्हरमन, प्रीती पटेल, डॉ. नील शास्त्राr हर्स्ट तर मजूर पक्षाचे कनिष्क नारायण, नवेंदू मिश्रा, प्रीत कौर गिल, तनमनजीत सिंग ढेसी, व्हॅलेरी वाझ, सोनिया कुमार, हरप्रीत उप्पल, सीमा मल्होत्रा, वरिंदर जुस, गुरिंदर जोसन, जस अठवाल, बॅगी शंकर, सतवीर कौर हे हिंदुस्थानी वंशाचे उमेदवार खासदार झाले.

बॅलेट पेपरवर घडले परिवर्तन

हिंदुस्थानात ईव्हीएमद्वारे मतदान झाले. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोळ पाहायला मिळाला. प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातही गेली. ब्रिटनसारख्या प्रगत देशात मात्र बॅलेट पेपरद्वारे मतदान यंत्रणा राबविण्यात आली. ईव्हीएम या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये घोळ होऊ शकतो. त्यामुळे येथे बॅलेट पेपरद्वारे मतदान झाले. तब्बल पाच कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, हिंदुस्थानातही पुन्हा बॅलेट पेपरद्वारेच मतदान यंत्रणा राबविण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत आहे.